वाशीम,
Yogesh Kumbhejkar आधार सेवेत पारदर्शकता ठेवून नागरिकांना सहजसुलभ सेवा देणे हीच प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा आधार निरीक्षण समितीच्या बैठकीत केले.जिल्हा स्तरावरील आधार निरीक्षण समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.बैठकीत आधार सेवा तक्रार निवारण यंत्रणा बळकट करणे तसेच सर्व समाजघटकांपर्यंत आधार सेवा पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, महिला व बालकल्याणचे संजय गणवीर, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव ,डाक विभागाचे अधिकारी आदी यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती.
काही ठिकाणी नोंदणी किट एका दिवसात अनेक ठिकाणी हलविली जात आहेत. यापुढे किट केवळ मंजूर ठिकाणीच वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. आधार शिबिर आयोजित करताना संबंधित केंद्र चालकाकडे परवानगी असणे आवश्यक राहील, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांना आधार संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आता मुंबईला जाण्याची गरज नाही. युआयडीएआय हेल्पलाईन १९४७ किंवा ईमेलद्वारे तक्रार नोंदवता येणार असून, त्यासाठी एसआरएन क्रमांक दिला जातो व त्यावर सातत्याने देखरेख केली जाईल. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार शाखेत थेट संपर्क साधता येईल.
रुग्णालये व दवाखान्यांमध्ये नवजात बालकांची थेट आधार नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच आयपीपीबी टपालसेवकांमार्फत घरोघरी आधार सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आधार नोंदणी केंद्रांवर डिजिटल पेमेंट सुविधा अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपंग व तृतीयपंथीय नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५—७ वयोगटातील तसेच १५—१७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये एमबीयु आधार अपडेट शिबिरे घेण्याचे आदेश दिले गेले असून ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल. सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले.
१ ऑटोबर २०२५ पासून आधार सेवांच्या शुल्कांमध्ये बदल झाले आहेत. नागरिकांनी आधार पावतीवर दिलेल्या दरानुसारच शुल्क भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, बँका व इतर संस्था यांनी आधारची छायांकित प्रत स्वीकारणे बंद करून युआर कोड किंवा मास्क आधार आधारित पडताळणी सुरू करणे आवश्यक आहे.