तभा वृत्तसेवा
किनवट,
Adivasi reservation protest, राज्यात हैद्राबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीच्या विरोधात आज किनवट शहरात आदिवासी समाज बांधवांनी आरक्षण बचाव महामोर्चाद्वारे कडाडून विरोध केला.
किनवट शहरात भीमराव केराम यांच्या नेतृत्वात गोंडराजे हुतात्मा शंकर शहा रघुनाथ शहा मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट असा लाखोंच्या संख्येने आदिवासींचा महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील लाखोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.
मोर्चामध्ये आदिवासी पारंपरिक ठेमसा नृत्य संच, पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. मोर्चाचे रुपांतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सभेमध्ये झाले. या सभेला सर्वपक्षीय आदिवासी नेते मंडळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी आयोजित सभेत आमदार भीमराव केराम, नारायण सिडाम, प्रा. किशन मिरासे, शंकर सिडाम, दादाराव टारपे, जनाबाई डुडुळे, एकनाथ बुरकुळे, डॉ. पुंडलिक आमले, जयवंत वानोळे, माधव मरसकोल्हे, नामदेव कातले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन भारत हातमोडे यांनी, तर आभार गोविंद अंकुरवाड यांनी मानले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. भीमराव केराम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संवैधानिक आरक्षणाचे रक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक आदिवासी समाज बांधवांची नैतिक जबाबदारी आहे. बंजारा समाजाने अनुसूचित जमातीतून आरक्षण मागताना पुढे केलेले निकष हे अकल्पनिय असून ते हास्यास्पद आहे. आरक्षण हा विषय घाई, गडबड व गर्दी करून मिळवण्याचा किंवा देण्याचा विषय नाही. हजारो वर्षांच्या संघर्ष व त्रासानंतर मिळालेला संवैधानिक अधिकार आहे. आदिवासींवर कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही, आम्हाला डंक मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात विस्तू लावल्याशिवाय राहणार नाही. बिरसा मुंडाचा उलगुलान झाल्याशिवाय राहणार नाही.
सभेनंतर आ. भीमराव केराम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सहायक जिल्हाधिकारी झेनिथचंद्र दोनतुला यांना निवेदन सादर करुन बंजारा समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणास विरोध दर्शवला. प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व राज्य सरकारला स्पष्ट विनंती केली की, बंजारा समाजाला एसटी दर्जा देण्याची मागणी तत्काळ फेटाळून लावावी. मुख्यमंत्री सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहून आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवेदनावर प्रा. किशन मिराशे, नारायण सिडाम, जनाबाई डुडुळे, माधव मरस्कोले, भारत हातमोडे, देवेंद्र कोवे, डॉ. उत्तम धुमाळ, अॅड. प्रतीक केराम, सरपंच बालाजी भिसे, दादाराव टारपे, देवराम सिडाम, आनंद कुडमेते, गंगाराम गमवाड, दत्ता आडे, जया कनाके, संतोष मरस्कोल्हे, ज्ञानेश्वर सिडाम, भगवान दुरदुके, शंकर सिडाम, वसंत कुडमते, डॉ. सुभाष वानोळे, बालू पाचपुते यांच्या स्वाक्षèया आहेत.