मेरी मौत ही मेरी दुल्हन होगी...

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Bhagat Singh Jayanti भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतीची ज्योत चेतवणाऱ्या आणि अत्यंत कमी वयात हसत-हसत मृत्यूला सामोरे जाणाऱ्या शहीद भगतसिंग यांची आज (२८ सप्टेंबर) जयंती देशभरात साजरी केली जात आहे. भगतसिंग यांचा जन्म ब्रिटिश भारतातल्या पंजाब प्रांतातील बंगा गावात झाला, जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. त्यांच्या वडिलांचं नाव किशन सिंह आणि आईचं नाव विद्यावती होतं. त्यांच्या घरात देशभक्तीची आणि स्वातंत्र्याच्या लढ्याची परंपरा होती. लहानपणापासूनच त्यांनी अशा वातावरणात आयुष्य घालवलं जिथे देशसेवा ही सर्वात मोठी जबाबदारी मानली जात होती. याच पार्श्वभूमीमुळे त्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द लवकरच रुजली. भगतसिंग हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर एक विचारवंत, लेखक आणि युवकांच्या मनात ज्वाळा पेटवणारा नेता होते. त्याग आणि बंडखोरीच्या त्यांच्या मार्गाने संपूर्ण देशाच्या मनामध्ये एक आग पेटवली होती. विशेष म्हणजे त्यांच्या विचारधारेला आणि क्रांतिकारक मार्गाला तत्कालीन काही प्रमुख राजकीय नेत्यांनीही आपला पाठिंबा दिला होता. त्यात मोहम्मद अली जिन्ना आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका विशेष ठरली.
 
 

Bhagat Singh Jayanti 
हिंदुस्तान आपल्याच प्रिय मुलांना वाचवू शकला नाही
सप्टेंबर १९२९ मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तुरुंगात असताना त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात भूख हडताल सुरू केली होती. त्यावेळी शिमला येथे सेंट्रल असेंब्लीची बैठक सुरु होती. या सभेत मोहम्मद अली जिन्ना हे बॉम्बेचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी सभेत भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाचा जोरदार पाठपुरावा केला. जिन्ना म्हणाले होते की, “जे लोक आपली प्राणाहुती देण्यासाठी तयार आहेत, त्यांना फक्त गुन्हेगार मानणे हा न्यायाचा अपमान आहे. त्यांच्याशी गुन्हेगारासारखे नव्हे, तर राजकीय कैद्यांप्रमाणे वागणूक मिळायला हवी.”जिन्ना यांचा हा स्पष्ट आणि ठाम सूर सत्ताधाऱ्यांवर कठोर भाष्य करणारा होता. त्यांनी भगतसिंग यांच्या भूखहडतालीकडे केवळ सहवेदना न दाखवता, त्यामागील ध्येय आणि मूल्यांनाही मान्यता दिली होती. जिन्ना यांचे हे वक्तव्य त्या काळात अल्पसंख्याक नेत्याकडून आलेली एक निर्णायक राजकीय दखल होती.
 
 
 
 
 
त्याचप्रमाणे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही भगतसिंग यांच्या शौर्याला सलाम केला होता. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत झालेल्या एका सभेत नेहरू यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले होते की, “त्यांच्या अखेरच्या काळात मी शांत राहिलो. माझं एकही वाक्य त्यांच्या शिक्षेत अडथळा ठरू नये म्हणून. पण माझं अंतःकरण खवळलेलं होतं. आज हिंदुस्तान आपल्याच प्रिय मुलांना वाचवू शकला नाही, याचं दु:ख मनात आहे.”
 
 
 
 
नेहरूंची ही कबुली केवळ एक भावनिक प्रतिक्रिया नव्हती, तर देशाच्या राजकीय नेतृत्वाकडून भगतसिंग यांच्या बंडखोर पण सुस्पष्ट राष्ट्रभक्तीला मान्यता देणारी होती.आज भगतसिंग यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या विचारांवर आधारित परिसंवाद, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून देशभरात अभिमान व्यक्त केला जात आहे.शहीद भगतसिंग हे केवळ इतिहासात रममाण होण्यासाठी नाहीत, तर आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांची नाळ पुन्हा समजून घेऊन नव्या भारताच्या उभारणीसाठी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना यांसारख्या नेत्यांनीही ज्या भगतसिंगच्या धैर्याला मान्यता दिली, त्या विचारांची आजही समाजाला गरज आहे.
 
 
 
 
 
 इंग्रज मला मारू शकतील पण...
त्यांच्या क्रांतिकारी आयुष्यातील अनेक किस्से आजही जनतेच्या मनात ठसले आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली होती, तेव्हा भगतसिंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते – "जर माझा विवाह ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या काळात झाला,तर मेरी मौत ही मेरी दुल्हन होगी...." असे ते म्हणायचे हे त्यांच्या देशभक्तीचं सर्वोच्च प्रतीक मानलं जातं. कारागृहात असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी भीती नव्हती. एकदा जेव्हा त्यांच्या आई त्यांना भेटायला आल्या, तेव्हा ते मोठ्याने हसत होते. त्यांनी म्हटलं होतं, "हे इंग्रज मला मारू शकतील, पण माझ्या विचारांना नाही. माझ्या आत्म्याला नाही."
 
 
 
 
भगतसिंग यांच्यासह राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. विशेष म्हणजे, फाशीची अधिकृत तारीख २४ मार्च होती, मात्र ब्रिटिशांनी ती अकरा तास आधीच दिली. त्यांच्या विचारांची प्रचंड प्रभावशक्ती आणि वाढता जनसमर्थन यामुळे ब्रिटिश सरकार हादरले होते. या तिघांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि स्वातंत्र्यलढ्याला वेग आला.शहीद भगतसिंग यांना फक्त एक क्रांतिकारक म्हणून नव्हे, तर विचारवंत, लेखक आणि स्वप्न पाहणारा युवा नेता म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे लेख, भाषणे आणि पत्रं आजही तरुण पिढीला जागं करतात. "इन्कलाब झिंदाबाद" ही त्यांची गर्जना केवळ एक घोषवाक्य नव्हे, तर संपूर्ण चळवळीचा आत्मा होती.२८ सप्टेंबर रोजी भगतसिंग यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या महापुरुषाला अभिवादन करण्यात येते. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन नव्या पिढीला राष्ट्रसेवेच्या वाटेवर मार्गदर्शन दिलं जातं.शहीद भगतसिंग यांचा आवाज आजही जिवंत आहे – तो आवाज जो अन्यायाविरोधात उभा राहण्याची ताकद देतो, जो म्हणतो, "स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जिवंत विचारांची गरज आहे." त्यांची जयंती ही केवळ स्मरणाची नाही, तर त्यांच्या विचारांची पुनर्पुर्तता करण्याची संधी आहे.