ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
लातूर,
Bhaskar Chandanshiv : ग्रामीण भागातील जगणं, दुष्काळ आणि शेतकरी जीवनाचे वास्तव आपल्या लेखणीद्वारे प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव (वय ८०) यांचे शनिवारी निधन झाले. लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 
 
bhaskar chandshiv
 
 
 
भास्कर चंदनशिव यांच्या लेखणीतील ‘लाल चिखल’ हा कथासंग्रह घराघरात पोहोचला होता. ग्रामीण जगण्याचे संघर्षमय चित्रण करणारे त्यांचे जांभळढव्ह (1980), मरणकळा (1983), अंगारमाती (1991), नवी वारुळ (1992), बिरडं (1999) असे कथासंग्रह विशेष गाजले. ते २८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
जीवनप्रवास
 
 
भास्कर चंदनशिव यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगाव (ता. कळंब) येथे झाला. त्यांचे खरे नाव भास्कर देवराव यादव होते; मात्र दत्तकविधानामुळे ते पुढे भास्कर तात्याबा चंदनशिव या नावाने ओळखले गेले. वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी लेखनास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण कळंब येथे, पुढील शिक्षण अंबाजोगाई व छत्रपती संभाजी नगर येथे पूर्ण केले. मराठी विषयात एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर १९७२ मध्ये ते वरिष्ठ महाविद्यालयात मराठी प्राध्यापक झाले. २००५ मध्ये बलभीम महाविद्यालय, बीड येथून ते निवृत्त झाले आणि पुढे कळंब येथे स्थायिक झाले.
 
पुरस्कार आणि सन्मान
 
 
भास्कर चंदनशिव यांच्या साहित्य योगदानाची दखल राज्यभर घेण्यात आली. आचार्य अत्रे पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रामीण साहित्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
 
भास्कर चंदनशिव यांच्या निधनाने ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणारा प्रभावी आवाज हरपल्याची भावना साहित्यविश्वात व्यक्त केली जात आहे.