नागपूर,
Hansraj Ahir लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता आणि साहित्य लेखन हे लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे पत्रकार आणि साहित्यिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारणावर लेखन करणे आणि साहित्य निर्मिती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केले.
‘शह-काटशह’ कथासंग्रहाचे प्रकाशन
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित शह-काटशह या राजकीय कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. साहित्य भारतीच्या वतीने स्थानिक धरमपेठ कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात निवासी संपादक श्रीपाद अपराजित, आकाशवाणीचे निवृत्त वृत्तसंचालक आणि साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, साहित्य भारती, विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष लखनसिंह कटरे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत लाखे, प्रांत मंत्री सुनील शिनखेडे आणि लेखक अविनाश पाठक उपस्थित होते.
हंसराज अहिर म्हणाले, राजकारणातील विविध घटनांचा आढावा घेऊन त्यावर नित्यनेमाने लेखन करणे हे पत्रकार आणि साहित्यिकांचे कामच आहे. जर राजकारणी चुकत असतील तर त्यांच्या चुका दाखवून टीका करणारे लेखनदेखील पत्रकार आणि साहित्यिकांनी करायला हवे आणि त्याचे स्वागतही व्हायला हवे, असेही ते म्हणाले.
राजकीय पत्रकारिता करताना पत्रकारांवर बरीच बंधने येत असतात. अविनाश पाठक यांनी संतुलन ठेवत हे राजकीय लेखन केले आहे, याकडे नितीन केळकर यांनी या पुस्तकावर भाष्य करताना लक्ष वेधले. लोकशाही मूल्यांचे अवमूल्यन थांबविण्याची किमया पत्रकार आणि साहित्यिक लेखणीद्वारे साधू शकतात, असे प्रतिपादन लखनसिंह कटरे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील शिनखेडे, विनय माहुरकर, डॉ. स्वाती मोहरीर यांनी परिश्रम घेतले.