शिमला,
Cold Desert Biosphere Reserve हिमाचल प्रदेशाच्या लाहौल-स्पीती जिल्ह्यात वसलेल्या 'कोल्ड डेजर्ट बायोस्फीयर रिजर्व'ने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतली आहे. युनेस्कोने या दुर्गम आणि जैवविविधतेने समृद्ध भागाचा समावेश आपल्या 'वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीयर रिजर्व्स' (WNBR) मध्ये केला आहे. या निर्णयामुळे भारतातील अशा मान्यताप्राप्त जैवमंडळ राखीव क्षेत्रांची संख्या आता १३ झाली असून, कोल्ड डेजर्ट हे भारताच्या हिमालयीन भागातील पहिले असे क्षेत्र आहे ज्याला ही प्रतिष्ठा मिळाली आहे.
हा ऐतिहासिक Cold Desert Biosphere Reserve निर्णय युनेस्कोच्या ‘मॅन अँड द बायोस्फीयर’ कार्यक्रमाच्या ३७व्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेत (MAB ICC) पॅरिस येथे घेण्यात आला. भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती समाजमाध्यमांद्वारे जाहीर करताना देशासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले.सुमारे ७,७७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले हे जैवमंडळीय राखीव क्षेत्र ट्रान्स-हिमालयीन प्रदेशात स्थित आहे. या भागात स्पीती वन्यजीव विभाग, लाहौल फॉरेस्ट डिव्हिजन, पिन व्हॅली नॅशनल पार्क, किब्बर वन्यजीव अभयारण्य, चंद्रताल तलाव आणि सर्चू पठार यांचा समावेश होतो. समुद्रसपाटीपासून सुमारे ३,३०० ते ६,६०० मीटर उंचीवर पसरलेल्या या क्षेत्रात हिमालयीन हवामान आणि थंड, कोरडी पारिस्थितिकीय प्रणाली आढळते.
राखीव क्षेत्राच्या रचनेमध्ये तीन महत्त्वाचे विभाग आहेत — कोअर झोन (२,६६५ चौरस किमी), बफर झोन (३,९७७ चौरस किमी) आणि ट्रान्झिशन झोन (१,१२८ चौरस किमी). या तीन विभागांद्वारे संवर्धन, शाश्वत वापर आणि स्थानिक समुदायांचा सहभाग यांच्यात संतुलन साधले जाते.
या जैवमंडळीय क्षेत्रात वनस्पतींच्या ७१३ हून अधिक प्रजाती आहेत, ज्यात १४ स्थानिक आणि ४७ औषधी वनस्पतींचा समावेश होतो. याशिवाय येथे १७ प्रकारचे सस्तन प्राणी आणि ११९ प्रकारचे पक्षी आढळतात. हिमालयातील दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींपैकी असलेला 'हिम बिबट्या' (Snow Leopard) हे या क्षेत्राचे विशेष आकर्षण आहे.
कोल्ड डेजर्ट Cold Desert Biosphere Reserve बायोस्फीयर रिजर्व हे केवळ नैसर्गिक वैभवाने समृद्ध नसून सांस्कृतिक वारशानेही परिपूर्ण आहे. येथील सुमारे १२,००० स्थानिक नागरिक पारंपरिक शेती, याक आणि शेळी पालन तसेच तिबेटी औषधी पद्धतीच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवत आहेत. या पारंपरिक ज्ञानाची जपणूक बौद्ध मठ आणि ग्रामपंचायती करत असून, हा समुदाय आधारित सेंद्रिय जीवनशैलीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.युनेस्कोच्या या निर्णयामुळे कोल्ड डेजर्टचे जैविक व पारिस्थितिक महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित झाले असून, भविष्यातील संशोधन, पर्यावरणीय शिक्षण आणि टिकाऊ पर्यटनासाठी नवीन संधी खुल्या झाल्या आहेत. हिमालयातील या अनोख्या जैवविविधतेच्या ठिकाणाला मिळालेली जागतिक मान्यता ही संपूर्ण भारतासाठी गौरवाची बाब ठरली आहे.