मुंबई,
Durga Puja 2025 साऱ्या देशात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी भव्य पंडाल उभारण्यात आले आहेत. अशाच एका पंडालात मुखर्जी कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजेचं आयोजन केलं. मात्र यंदाची पूजा कुटुंबासाठी काहीशी भावनिक ठरली, कारण काजोल आणि राणी मुखर्जी यांचे काका आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक देब मुखर्जी यांचं नुकतंच निधन झालं आहे.

दुर्गा पूजेच्या शुभप्रसंगी काजोल आणि राणी मुखर्जी यांनी एकत्र येत माँ दुर्गेचं स्वागत केलं. दोघीही पारंपरिक पेहरावात सजून आलेल्या होत्या. काजोलने सोनेरी साडी नेसली होती, तर राणीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. पंडालात माँ दुर्गेवर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि पूजा विधी पार पाडला. उपस्थित भाविकांनी आणि चाहत्यांनी या सुंदर दृश्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं.सोशल मीडियावर या पूजेचे अनेक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एक भावनिक क्षणही टिपण्यात आला आहे, जिथे काजोल, राणी आणि तनिषा मुखर्जी हे तिघं मिळून आपल्या दिवंगत काकांची आठवण काढत भावूक झाल्याचं दिसतं. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीही या भावनिक क्षणांत सहभागी झाले. या सर्व भावंडांचा एकत्रित व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या मनाला चटका लावत आहे.
या पूजेसाठी Durga Puja 2025 अभिनेत्री शरबानी मुखर्जी आणि सुमोना चक्रवर्ती याही उपस्थित होत्या. दोघींनीही अतिशय साधा आणि पारंपरिक लुक साकारला होता. त्यांनी काजोल आणि राणीसोबत अनेक फोटोसुद्धा क्लिक केले. या फोटोंनाही इंस्टाग्रामवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, शरबानी मुखर्जी या काजोलच्या चुलत बहिण असून, त्यांनी १९९७ साली आलेल्या *‘बॉर्डर’* या ब्लॉकबस्टर चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गा पूजेला बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मात्र कुटुंबाच्या एका आधारस्तंभाच्या अनुपस्थितीमुळे यंदाची पूजा अधिक भावूक वातावरणात पार पडली. श्रद्धा, एकत्रितपणा आणि नात्यांच्या जिव्हाळ्याचा हा सोहळा अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.