वर्धा,
fatal attack on police : सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिखबेडा येथे सुरू असलेल्या जुगारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. २५ रोजी घडलेल्या या घटनेत २ पीएसआय, १ सहाय्यक फौजदार असे तिघे जखमी झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार बावरी याला सावंगी पोलिसांनी २७ रोजी अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची ४ दिवसीय पोलिस कोठडीत रवानगी केली आहे तर २२ सहआरोपींची एक दिवसीय पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील २४ आरोपींपैकी एकाची आधीच न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

गुप्त माहितीच्या आधारे जुगारांवर कारवाईसाठी सावंगी पोलिसांची चमू शिख बेड्यावर गेली होती. पण ज्या ठिकाणी जुगार सुरू होता त्या कुटुंबाने व अन्य काहींनी थेट पोलिसांवर हल्ला केला. इतकेच नव्हे तर तलवार फिरकविण्यात आली. यात पोलिस उपनिरीक्षक सतीश दुधाने, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे आणि सहाय्यक फौजदार संजय पंचभाई हे जखमी झाले. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी राजकुमार बावरी हा फरार होता. अखेर त्यास २७ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. २८ रोजी वर्धा येथील सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व्ही. पी. खंडारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सहा प्रमुख मुद्यांच्या आधारे शासकीय वकिलाच्या माध्यमातून पोलिस विभागाने राजकुमार बावरीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सुमारे दीड तास दोन्ही बाजूचा युतिवाद झाल्यावर न्यायाधीश व्ही. पी. खंडारे यांनी मुख्य आरोपी राजकुमार बावरी याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.