नागपूर,
Mohanji Bhagwat : स्वयंसेवकांच्या जीवनाच्या तपस्येतून संघ गीतांचा जन्म होतो. मातृभूमीच्या भक्तीची ही उपज आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित नव्याने संगीतबद्ध ‘अजरामर संघगीत’चे लोकार्पण आज कविवर्य सुरेश भट सभागृहात झाले.
डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले तसेच अशोक मानकर, जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडी, दीपक खिरवडकर तसेच गायक शंकर महादेवन व्यासपीठावर उपस्थित होते. ‘अजरामर संघगीते’ या संग्रहात शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलेली 25 गीते समाविष्ट आहेत. काही गीतांना नव्याने चाली देण्यात आल्या.
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, संगीत व शब्द हे भावनेचे वाहक आहेत. उत्तम शब्द थेट हृदयाला भिडतात व त्याला संगीताची जोड असल्याने त्याचे ग्रहण अधिक गतिशील होते. संघ गीतांचे कवी शोधणे कठीण आहे. जीवनाची तपस्या स्वयंसेवकांकडून हे गीत तयार करून घेते, हे सांगताना त्यांनी बच्छराज व्यास यांचे उदाहरणही दिले.
संघाकडे भारतातील सर्व भाषांमधील गीते असून त्यांची संख्या सुमारे 25 हजारांच्या वर आहे.‘पूर्वी एकदा संघाच्या कार्यक्रमाला आल्यावर शंकर महादेवन म्हणाले होते की, हा कार्यक्रम म्हणजे एक सरगम आहे असे वाटते. आज त्यांनी आपल्या सरगमातून संघ निर्माण केला आहे’, असे गौरवोद््गार डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले.
प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची रचना ‘निर्मणो के पावन युग में’, डॉ. श्री.भा. भास्कर वर्णेकर यांची ‘मनसा सतत स्मरणीयम’ यासह विविध रचना शंकर महादेवन यांनी प्रत्यक्ष सादर केल्या. सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी ‘हम करे राष्ट्र आराधन’ गीताची महती सांगितली. नंतर महादेवन व चमूने ते संघगीत उत्तमपणे गायले. साने गुरुजी यांची ‘बलसागर भारत होवो हे गीत’ महादेवन यांनी सादर करताच ‘भारत की जय’ घोषणा उत्स्फूर्तपणे उपस्थितांनी दिल्या.
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेजी यांनी ‘चरैवेति चरैवेति’ गीताबद्दल मनोगत सांगितले. महादेवन यांनी ते उत्स्फूर्तपणे सादर केले. ‘संस्कृति सब की एक चिरंतन’ या गीताने सभागृहात ऊर्जा निर्माण केली. भैयाजी जोशी यांनी ‘ध्वज केशरी शिवाचा’ बाबत माहिती दिली. महादेवन यांनी ते गीत म्हटले. एकता स्वतंत्रता, समानता, सूरसंगम तालसंगम, विश्वमे गुंजे हमारी भारती आदी गीतेही ते गायले. संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख स्वांत रंजन यांनी शुभेच्छा दिल्या.
संचालन अभिनेते शरद केळकर यांनी केले. अनिल सोले यांनी आभार मानले. शंकर महादेवन, संगीतकार सौमिल शृंगारपुरे, संघ गीतांचा संग्रह करणारे कुणाल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर तसेच अविनाश घुशे, श्याम देशपांडे, कल्याण देशपांडे यांचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आला.
संघाचे प्रत्येक गीत प्रेरणादायी
संघाचे प्रत्येक गीत हे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे अत्यंत प्रेरणादायी गीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘स्वार्थ साध्य करताना वसुधेचे कल्याण विसरू नये’ हा अजरामर विचार संघ गीतातून प्रसारित होत असल्याचे सांगतानाच हे कायम कालातीत राहतील, असे ते म्हणाले. यावेळी अनेक गीतांचा उल्लेख करून त्यांनी संघ गीतातून राष्ट्रभक्ती, सांघिक भावना निर्माण होत असल्याचे सांगितले.
पुन्हा गायनासाठी निमंत्रण
आगामी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संघगीत संग्रहातील 25 गाणी गाण्यासाठी शंकर महादेवन यांना तसेच सूत्र संचालन करण्यासाठी शरद केळकर यांना निमंत्रण देत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यांनी प्रेरणादायी संघ गीतांच्या आठवणीना उजाळा दिला. ‘शत नमन माधव चरण’ हे गीत कायम स्मरणात राहिले आहे. शब्दसुरांच्या ताकदीने संघ भाव या गीतांनी थेट मनापर्यंत पोहोचतो व त्याचा आपल्या व्यक्तित्वावर सकारात्मक परिणाम होतो, असे ते म्हणाले.