वर्धेत दोन दिवस विदर्भ संस्कार भारतीचा कलासाधक संगम

*संगीतकार कौशल इनामदार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांच्यासह दिग्गज कलावंतांची मांदियाळी

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
वर्धा,
Sanskar Bharati Kalasadhak Sangam : संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताचा वर्धेत शनिवार ४, रविवार ५ ऑटोबर रोजी कलासाधक संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचे स्केच साकारणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत, संगीतकार कौशल इनामदार यांच्यासह दिग्गज कलावंत हजेरी लावणार असल्याची माहिती संस्कार भारतीचे वर्धा जिल्हा मंत्री मकरंद उमाळकर यांनी दिली.
 
 
 
wardha
 
 
 
स्थानिक अनेकान्त स्वाध्याय भवन परिसरात आयोजित या कलासाधक संगमचे उद्घाटन ४ रोजी सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते होईल. यावेळी संस्कार भारतीचे अभा संघटनमंत्री अभिजित गोखले दिल्ली, अ. भा. मंत्रीद्वय रवींद्र बेडेकर नाशिक, आशुतोष अडोणी नागपूर, पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, प्रांताध्यक्ष कांचन गडकरी नागपूर, प्रांत महामंत्री विवेक कवठेकर यवतमाळ, वर्धेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. राममोहन बैंदूर, संस्कार भारतीचे आधारस्तंभ व स्वागताध्यक्ष हरिभाऊ वझुरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
कलासाधक संगम च्या निमित्ताने विदर्भ प्रांत कलाकारांद्वारा साकारलेली रांगोळी, चित्रे, संगीताची साधने, धरोहर विभागातील पुरातन वस्तू तथा दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन वर्धेकर रसिकांसाठी दोन दिवस उपलब्ध असणार आहे. विभिन्न रांगोळी प्रकारा सोबतच वर्धा जिल्ह्यातील महानीय व्यतींची रेखाचित्रे असणार आहेत.
 
 
रविवारी ५ रोजी सकाळी १० वाजता जागतिक दर्जाचे चित्रकार तथा संस्कार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री वासुदेव कामत यांचे चित्रकार व रसिकांना प्रेरणादायी मर्यादापुरुषोत्तम राम विषयावर सादरीकरण होईल. याशिवाय या दोन दिवसात विदर्भ प्रांतातील संगीत, नृत्य, नाट्य, लोककला इत्यादी प्रकारातील कलासाधकांचे सादरीकरण देखील होणार आहे.
 
 
वर्धेतील कला सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी या आयोजनाच्या लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार भारतीचे वर्धा जिल्हाध्यक्ष सतीश बावसे, मंत्री मकरंद उमाळकर, मंचीय कला प्रांत सहसंयोजक मंगेश परसोडकर, पराग आजनसरे, सागर पेरके, पुलगाव यांनी केले आहे.
 
प्रगट मुलाखत
 
 
उद्घाटन समारंभातच ’मराठी अभिमान गीत’ साकारणारे, ’बालगंधर्व’ फेम संगीतकार कौशल इनामदार यांचा संगीतमय प्रवास उलगडणारी मुलाखत वर्धेकरांना ऐकायला मिळणार आहे. कौशल इनामदार यांची सांगीतिक मुलाखत तथा प्रांतातील कलाकारांची विविध कला प्रदर्शनी राहणार आकर्षण राहणार आहे.