नागपूर,
Music Program-Nagpur : गतकाळातील आठवणी, विविध रागांतील शास्त्रीय गीतांनी आणि त्यांच्या निर्मितीतील किस्स्यांच्या अपूर्वाईने ‘सावळाच रंग तुझा’ या सप्तकच्या नाट्य मैफलीतील रंगत वाढली. सप्तक आणि अरुणाई यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा, तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक व नाट्यलेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘सावळाच रंग तुझा’ हा संगीताचा कार्यक्रम झाला.
कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमात आसावरी बोधनकर जोशी, धनंजय म्हसकर आणि ओंकार प्रभुघाटे यांनी गीते सादर केली. या कार्यक्रमाचा प्रारंभ कलाकारांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘हे जगदीश सदाशिव शंकर’ या नांदीने केला. त्यानंतर ओंकार प्रभुघाटे यांनी ‘घेई छंद मकरंद’ हे प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचे नाट्यगीत सादर करून रसिकांची दाद मिळविली. आसावरी जोशी यांनी माणिक वर्मा यांचे ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’, धनंजय म्हसकर यांनी ‘मुरलीधर श्याम’ ही नाट्यगीते अतिशय तयारीने सादर केली.
यानंतर सावळाच रंग, तेजोनिधी लोह गोल, खुश रहो सनम, हसले मनी, ऋणानुबंधाच्या गाठी, आई तुझी आठवण, युवती मना, खेळ मांडियेला, जाळीमंदी, सुरत पिया की आदी एकाहून एक सरस नाट्यगीते सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदनाची जबाबदारी विघ्नेश जोशी यांनी समर्थपणे सांभाळली. नाट्य गीतांच्या निर्मितीतील अनेक जुन्या प्रसंगांचा उल्लेख करीत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.