गोंदिया,
Tiger attack घराच्या वऱ्हांड्यात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना देवरी तालुक्यातील चिचगड वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या धमदीटोला गावात रविवार २८ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. प्रभाबाई शंकर कोराम (४९) रा.आलेवाडा ता. देवरी असे आहे.
घराच्या अंगणात लघुशंकेकरीता गेलेल्या एका ५ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथे घडली होती. या घटनेला तीन दिवस लोटत नाही तोच आज मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रभाबाई ह्या या मुलीच्या बाळंतपणासाठी तिच्या घरी एक महिन्यापासून वास्तव्यास होत्या. काल रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते. यावेळी प्रभाबाई ह्या वऱ्हांड्यात खाटेवर झोपून होत्या. त्यात अंदाजे १ वाजताच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना, वाघाने हल्ला करून त्यांना घराशेजारी फरफटत नेत त्यांच्या अंगाचे लचके तोडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर बाब घरातील सदस्यांना सकाळी कळताच आरडाओरड केल्याने, घटनास्थळी गावकर्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती चिचगड वन परिक्षेत्र कार्यालय व पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळावर वाघाचे पगमार्क आढळून आले असून हल्ला वाघाने की इतर हिंस्रप्राण्याचा आहे, याचा तपास वन विभागाची करीत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृत प्रभाबाईच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
गावकर्यांचा वन विभागावर संताप ...
दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असूनही, वनविभागाकडून कसलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने संतप्त गावकर्यांनी वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला. जोपर्यंत मृतकाच्या कुटुंबाला भरपाई मिळत नाही, तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही, अशी भुमिका गावकर्यांनी घेतली. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृत प्रभाबाईच्या कुटूंबियांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सदर परिसरात वाघाचे अधिवास नव्हते, मात्र घटनास्थळावर तसे पगमार्क आढळून आले आहे. त्याचे तपास आमच्या चमूकडून करण्यात येत आहे. मृत महिलेच्या कुटूंबियांना १ लाख रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली आहे. तर शासनाच्या परिपत्रकानुसार २५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल. त्याचबरोबर गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल.
- पवन जोंग, उपवनसंरक्षक, गोंदिया