नवी दिल्ली,
Mann Ki Baat 126 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १२६व्या भागात देशभरातील प्रेरणादायी कार्यांचा उल्लेख करताना झारखंड आणि बिहारच्या दोन तरुणांचा विशेष गौरव केला. पारंपरिक कौशल्य आणि नवाचाराच्या संगमातून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या या तरुणांनी, आपल्या कार्यातून केवळ स्थानिकच नव्हे तर जागतिक पातळीवरही प्रभाव पाडला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “खादीप्रमाणेच भारताच्या हस्तचालन (हँडलूम) आणि हस्तकला (हँडीक्राफ्ट) क्षेत्रातही महत्त्वाचे परिवर्तन घडून येत आहे. देशात असे अनेक उदाहरणे आहेत, जी दर्शवतात की परंपरेला जर नवकल्पनांच्या धाग्याने जोडले, तर त्यातून विलक्षण परिणाम घडू शकतात.”
या पार्श्वभूमीवर त्यांनी झारखंडातील आशीष सत्यव्रत साहू यांच्या कार्याचा उल्लेख केला. ‘जोहार ग्राम बोर्ड’ या उपक्रमाच्या माध्यमातून आशीष यांनी आदिवासी वस्त्रप्रकार आणि पारंपरिक बुनाईच्या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे झारखंडची सांस्कृतिक ओळख आता देशाबाहेरही पोहोचत असून, आदिवासी वारशाची समृद्धता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहे, असे मोदींनी नमूद केले.त्याचप्रमाणे बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील स्वीटी कुमारी हिच्या कार्याचीही पंतप्रधान मोदींनी स्तुती केली. ‘संकल्प सृजन’ या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तिने मिथिला पेंटिंग या पारंपरिक कलाप्रकाराला ग्रामीण महिलांच्या उपजीविकेचे साधन बनवले आहे. आज तिच्यासोबत ५०० हून अधिक महिला जोडल्या गेल्या असून, त्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत.
पारंपरिक कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यातून महिलांना आत्मनिर्भर बनवणे, ही या उपक्रमांची खासियत असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.आपल्या संबोधनात त्यांनी तमिळनाडूच्या ‘याज नेचुरल्स’ या उपक्रमाचेही उदाहरण दिले. अशोक जगदीशन आणि प्रेम सेल्वाराज या दोन तरुणांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून पारंपरिक तंत्रज्ञानाच्या आधारावर पर्यावरणपूरक योगा मॅट तयार करण्यास सुरुवात केली. घास आणि केळ्याच्या तंतूंपासून तयार केलेल्या या मॅटना हर्बल रंगांनी रंगवलेगेले असून, यासाठी त्यांनी २०० कुटुंबांना प्रशिक्षण देऊन रोजगारही उपलब्ध करून दिला.पंतप्रधानांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, देशाच्या परंपरेत आणि सांस्कृतिक वारशात अमाप संधी दडलेल्या आहेत. त्यांचा शोध घेतला, नवाचार जोडला आणि सामाजिक बांधिलकी ठेवली, तर समाजाच्या सर्व स्तरांमध्ये मोठा बदल घडवून आणता येतो.त्यांनी नमूद केले की, अशा यशोगाथा केवळ प्रेरणादायी नसून, त्या युवकांना नव्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बळ देणाऱ्या आहेत. “जर आपला हेतू स्पष्ट असेल, तर यश आपल्यापासून फार दूर नसते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.