वर्धा,
Wardha News : जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अधिकाधिक उंचावण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम मिशन अध्ययन समृद्धी या नावाने सुरू करण्यात आला आहे. शनिवार २७ रोजी या उपक्रमाच्या उद्बोधन कार्यशाळेचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी केला.
शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगती व दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्मिती ही जिल्हा परिषदेची प्राधान्यक्रमातील जबाबदारी आहे. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नियमित शालेय अभ्यासक्रमातील निकालाच्या प्रमाणात सुधारणा करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी शाळांना मिळालेल्या शैक्षणिक साधनांचा परिणामकारक वापर आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेचे शैक्षणिक बळकटीकरण आवश्यक आहे. विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व समृद्ध अध्ययन अनुभव मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याचे अध्ययन समृद्ध करणे, वर्ग भेटी व शैक्षणिक पर्यवेक्षण वाढविणे, अध्यापनाची गुणवत्ता व शिक्षकांची कार्यक्षमता उंचावणे, नवोदय शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांमधील यशाचे प्रमाण वाढविणे, जिल्हा परिषद शाळांचा निकालाचा टका उंचावणे तसेच वर्धा जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेत राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवून देणे ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे. उपक्रम प्रभावी करण्यासाठी केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना विशेष जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहे. वर्धा जिल्हा राज्यात शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धेत अग्रक्रमावर येईल, अशी अपेक्षा व्यत करण्यात आली आहे.
मिशन अध्ययन समृद्धी हा केवळ एक उपक्रम नसून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रगतीसाठी एक चळवळ आहे. प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास साधणे हेच या मोहिमेचे ध्येय आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये यांनी सांगितले.