तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sanjay Rathod अतिवृष्टीने जिल्ह्यात शेती, घरे पिकांचे नुकसान झाले. एकही नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट आदेश राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा पालकमंत्री राठोड यांनी घेतला.

यावेळी त्यांनी बाधित शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, तसेच पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले. तसेच या आपत्कालीन परिस्थितीत एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.जिल्ह्यातील बहुतेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी शेती, घरे व जनावरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः नाल्यांच्या शेजारील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा सर्व नुकसानींचे पंचनामे अचूक व संपूर्णपणे व्हावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. पंचनाम्यांची प्रक्रिया करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वगळला जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी असून, अशा ठिकाणी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. पूरस्थितीमुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता लक्षात घेता, पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.पंचनामे केवळ खाजगी मालमत्तांपुरते मर्यादित न ठेवता, शासकीय मालमत्तेचे जसे की रस्ते, वीज खांब, पाणीयोजना, शासकीय इमारती यांचे देखील सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
बैठकीला जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, विजय सूर्यवंशी, तसेच तहसीलदार योगेश देशमुख, पुरुषोत्तम भुसारी, रवि काळे, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.