नागपूर,
Ravindra Kumar Singal काम देण्याचे आमिष दाखवून मजुरांची तस्करी करण्याचा कंत्राटदार एजंटचा प्रयत्न सीताबर्डी पोलिसांनी हाणून पाडला. भयभीत 37 मजुरांची एजंटच्या तावडीतून सुटका करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी क्षणाचाही विलंब न लावता मजुरांना सुरक्षित आणण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी एजंटविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
सर्व 37 Ravindra Kumar Singal मजूर छदवाडा जिल्ह्यातील (मध्यप्रदेश) रहिवासी आहेत. जगण्यासाठी आणि कुटुंबाला जगविण्यासाठी अंगमेहनतीशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही. याच संधीचा गैरफायदा घेत काही एजंट्सने काम देण्याचे त्यांना आमिष दाखविले. पाचशे ते दोन हजार अग्रिमही दिले. सौंसरला काम असल्याचे सांगून त्या सर्वांना नागपूरला आणले. यात 23 महिला, 5 प्रौढ पुरुष आणि 9 अल्पवयीन मुले (3 मुली आणि 6 मुले) यांचा समावेश आहे. त्यांना वाशीममार्गे साताऱ्याला नेले जात होते. मात्र, वाशीमच्या पेट्रोल पंपावर मजुरांनी विरोध दर्शविला. आम्ही एवढ्या लांब कामाला जात नाही. दरम्यान एका जागरूक मजुराने 112 वर पोलिसांना माहिती दिली. वाशीम पोलिस पोहोचले. तसेच या घटनेची माहिती एका एनजीओपर्यंत पोहोचविली गेली. एनजीओने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्याशी संपर्क केला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून मजुरांना नागपुरात पाठविले.
पोलिस आयुक्तांनी Ravindra Kumar Singal या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेतली. सीताबर्डी पोलिसांना सांगितले. सीताबर्डी पोलिस रेल्वे स्थानक मार्गावरील मध्यप्रदेश बसस्थानकावर पोहोचले. कामगार नागपुरात येताच दुसरा एजंट तयारच होता. काम नाकारले म्हणून त्या एजंटने मजुरांकडे एक लाख रुपयाची मागणी केली. तडजोडीनंतर बळजबरीने त्यांच्याकडून 57 हजार रुपये घेतले. त्या सर्वांना एका बसमध्ये बसविले आणि घेऊन जाण्याच्या तयारीत होता. बस सुटणार त्याच वेळी सीताबर्डी पोलिस पोहोचले. सर्व मजुरांना सुरक्षित ठाण्यात आणले. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी एजंट विरुद्ध मानवी तस्करी, खंडणी, चाईल्ड लेबर ॲक्ट आदी गुन्ह्यांची नोंद केली.
सीताबर्डी पोलिसांची मानवता
सीताबर्डी पोलिसांनी भयभीत झालेल्या 37 मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. ठाण्याच्या परिसरातच बसून त्यांना पोटभर भोजन दिले. त्यांच्यासाठी चहाची व्यवस्था केली. घाबरू नका, पोलिस तुमच्यासोबत आहेत, असा विश्वास त्यांना दिला आणि त्यांच्या गावी सुरक्षित रवाना केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विजय दिघे, उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे, मोसमी कटरे, विनोद तिवारी, उमेश तसरीकर, कपिल राऊत, राहुल भोपळे, यांनी सहकार्य केले.
शोषण होण्यापासून बचाव
तत्काळ कारवाईमुळे 37 निरपराध जीव शोषणापासून वाचले. सर्व आरोपींना अटक करण्यासाठी कठोर प्रयत्न सुरू आहेत. आंतराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे. ऑपरेशन शक्तीअंतर्गत नागपूर पोलिस ट्रॅफिकिंग आणि संवेदनशील गटांच्या शोषणाविरुद्ध लक्ष्यित मोहीम राबवीत आहेत. नागपूर पोलिस नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी, ट्रॅफिकिंग नेटवर्क्सचे विघटन करण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
डॉ. रवींद्र कुमार सिंगल पोलिस आयुक्त