छत्तीसगड,
Abujhmad anti-Naxal operation, छत्तीसगडमधील अबूझमाडच्या घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांकडून सुरू असलेल्या सघन नक्षलविरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान कोडलियार परिसरात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षाबलांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटके, नक्षली साहित्य आणि युद्धसामग्री जप्त केली आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांची मोठी कटकारस्थान उधळून लावण्यात यश मिळाले आहे.
नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेटा पोलिस हद्दीतील कोडलियार मिचिंगपारा व खालीपारा या डोंगराळ भागात नक्षली डंपची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, जिल्हा बल, ITBP च्या ५३व्या बटालियनची बी कंपनी आणि बीडीएस (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड) यांच्यासह संयुक्तपणे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. २५ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम २७ सप्टेंबरपर्यंत चालली.या काळात सुरक्षाबलांना पाच कुकर बाँब सापडले, ज्यामध्ये सुमारे ५-५ किलो वजनाची IED (इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस) फिट करण्यात आलेली होती. बीडीएस टीमने या सर्व स्फोटकांचं यशस्वीपणे निष्क्रियकरण केलं. या भागातून मिळालेल्या नक्षली डंपमध्ये लिथियम बॅटऱ्या, वायर, बूबी ट्रॅप स्विच, वॉकी-टॉकी चार्जर अॅडॉप्टर, नक्षली गणवेश, बेल्ट, पाउच, बॅग, युद्धसामग्री आणि मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्याचा समावेश आहे.
पोलिसांनी Abujhmad anti-Naxal operation, दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण सामग्री ‘कुतुल एरिया कमिटी’च्या नक्षलवाद्यांशी संबंधित आहे. ही संघटना सुरक्षाबलांना आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सक्रिय होती. गेल्या काही महिन्यांमध्ये याच भागातून दुसऱ्यांदा अशाप्रकारची धोकादायक सामग्री हस्तगत करण्यात सुरक्षाबलांना यश आलं आहे.या कारवाईमुळे नक्षलविरोधी मोहिमेला मोठा बळ मिळालं असून, नक्षल चळवळीला जबरदस्त धक्का बसला आहे. पोलिस अधीक्षक रॉबिन्सन गुडिया, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय साबद्रा आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक (नक्षल ऑप्स) अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्यासाठी ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे.
याआधीही २२ सप्टेंबर रोजी अबूझमाड परिसरात दोन नक्षल कमांडर – राजू दादा आणि कोसा दादा – यांचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. त्याआधी कुख्यात नक्षल नेता बसवराजू यालाही याच भागात सुरक्षाबलांनी ठार केलं होतं. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नक्षल संघटनांची पकड ढासळत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.नारायणपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या यशस्वी कारवाईमुळे दिलासा निर्माण झाला आहे. नक्षलवाद्यांकडून मिळणाऱ्या धमक्या आणि हिंसेच्या छायेत जगणाऱ्या गावकऱ्यांना आता अधिक सुरक्षित वाटू लागलं आहे. सुरक्षाबलांचे हे प्रयत्न स्थानिक नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत असून, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा नक्षलवादाच्या पूर्ण उच्चाटनासाठी कटिबद्ध असल्याचं चित्र या कारवाईमधून समोर आलं आहे.