धमदीटोला प्रकरणात शिकार करणारा वाघ नव्हे बिबट

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
गोंदिया,

घराच्या वर्‍हांड्यात झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे २८ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता घडली होती. दरम्यान, याप्रकरणात शिकार करणारा वाघ नसून बिबट असल्याचे समोर आले असून वन विभागाच्या पथकाने २८ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने त्या बिबट्याला जेरबंद केले. धमकीटोला येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या प्रभा शंकर कोराम या मुलीच्या बाळंतपणासाठी तिच्या घरी एक महिन्यापासून वास्तव्यास होत्या. २८ सप्टेंबर रोजी १ वाजताच्या सुमारास त्या झोपेत असताना, वाघाने हल्ला करून त्यांना बेडवरील चादर व ब्लँकेटसह घराशेजारी फरफटत नेत त्यांच्या अंगाचे लचके तोडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.




सदर बाब घरातील सदस्यांना सकाळी कळताच आरडाओरड केल्याने, घटनास्थळी गावकर्‍यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती चिचगड वन परिक्षेत्र कार्यालय व पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच वनविभागाच्या वतीने मृत महिलेच्या कुटूंबाला १ लाख रूपये आर्थिक मदत देण्यात आली. दरम्यान नागपूरच्या वनरक्षक श्रीलक्ष्मी, गोंदियाचे उपवनसंरक्षक पवनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (तेंंदू व कॅम्प) व सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) तसेच दक्षिण देवरी वनपरिक्षेत्राधिकार्‍यांच्या उपस्थितीत गोंदिया वनविभाग व साकोली वनविभागाच्या रॅपीड रेक्सू पथकाने २८ सप्टेंबर रोजी घटनास्थळामागील जंगलात शोधमोहिम राबविली. यादरम्यान महिलेची शिकार करणारा वाघ नसून बिबट असल्याचे समोर आले असून रात्री ९ वाजताच्या सुमारास जंगलातून बिबट्याला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, ठाणेदार जनार्दन हेगडकर, योगीता चापले, राठोड, आंदे, बोंडे, प्रविण टांगे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केली.