दुबई.
Pakistan captain's anger दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करत स्पर्धेचं नववं विजेतेपद पटकावलं. या पराभवानंतर पाकिस्तान संघातील अस्वस्थता आणि संताप स्पष्ट दिसून आला. कर्णधार सलमान आघाने तर सार्वजनिक ठिकाणी उपविजेत्या संघाला मिळालेला चेक जमिनीवर फेकून दिला, ज्यामुळे मोठा गदारोळ उडाला. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात एसीसीचे प्रतिनिधी अमिनुल इस्लाम यांनी उपविजेत्या संघाचा चेक सलमान आघाला दिला. परंतु आघाने तो घेतल्यानंतर तत्काळ जमिनीवर फेकला. प्रेक्षकांनी यावर मोठा आरडाओरडा केला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आघा म्हणाला, पराभव पचवणे कठीण आहे. आम्ही गोलंदाजी चांगली केली पण फलंदाजी फारच कमजोर ठरली.
यापूर्वीच पाकिस्तानचे गृहमंत्री आणि एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी भारतीय संघाला न देण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंनी नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे ट्रॉफी आणि पदके हॉटेलमध्ये नेण्यात आली. या वर्तनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची घनघोर फजिती झाली.
सूर्यकुमार यादवची भूमिका
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, मी कधीही विजेत्या संघाला ट्रॉफी न देता पाहिले नाही. पण माझ्यासाठी माझे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हाच खरा ट्रॉफी आहे. त्याने पुढे स्पष्ट केलं की हा निर्णय संघाने स्वतः घेतला, त्यामागे बाह्य दबाव नव्हता. सामन्यानंतर त्याने एक्सवर लिहिलं “सामना संपल्यानंतर फक्त विजेत्यांनाच आठवले जाते, ट्रॉफीचा फोटो नाही.
मैदानावरील तणाव
आशिया कपदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव स्पष्ट दिसून आला. भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं. Pakistan captain's anger भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यात विजय मिळवला. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’*मुळे या स्पर्धेला अधिक संवेदनशील पार्श्वभूमी मिळाली होती. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तान संघ पराभवाच्या वेदनेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर हसण्याचा विषय ठरला, तर भारतीय संघाने विजयाबरोबरच आपली भूमिका ठामपणे मांडून चाहत्यांची मनं जिंकली.