शेतकऱ्यांचे नुकसान मोजा, मदत त्वरित करा!

विशेष अधिवेशनाची राज्यपालांकडे मागणी

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
मुंबई
Vijay Wadettiwar राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहून आपल्या मागणीला दुजोरा दिला आहे.
 
 

Vijay Wadettiwar 
मराठवाडा, जालना, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, मुंबई, बीड, परभणी, धुळे, नाशिक, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे नुकसान अपार आहे. काही ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.
 
 
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांच्या वेदना केवळ दौऱ्यांमधून ऐकून उपयोग नाही, तर विधीमंडळात व्यापक आणि ठोस चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विशेष अधिवेशनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीरतेने समजून घेता येतील आणि धोरणात्मक निर्णय घेऊन तातडीच्या उपाययोजना राबवता येतील.
 
 
 
अधिवेशनात Vijay Wadettiwar  पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सानुग्रह मदत, कर्जमाफी, पिकविमा, बियाणे व खतांच्या उपलब्धतेसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, पंचनामे तात्काळ पूर्ण करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदतीचे वाटप सुरू करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून अक्षम्य विलंब होतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटतो आहे.राजकीय वर्तुळातही वडेट्टीवार यांच्या या मागणीला महत्त्व प्राप्त होत असून, हा विषय विधिमंडळात उचलून धरल्यास शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याची गरज असून, या विषयावर राजकारण न करता तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट लक्षात घेता, शासनाने या मागणीवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी अपेक्षा आता सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.