Tauqir Raza arrested उत्तर प्रदेशातील बरेली येथे २६ सप्टेंबर रोजी उसळलेला हिंसाचार आता मोठ्या कटकारस्थानाचे रूप घेऊ लागला आहे. पोलिसांच्या एफआयआरनुसार, या हिंसाचारामागे 'आय लव्ह मुहम्मद' मोहिमेच्या नावाखाली आखलेला सुनियोजित डाव होता आणि त्यामध्ये आयएमसीचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान हे मुख्य आरोपी आहेत. शुक्रवारी नमाजानंतर शेकडो निदर्शक अला हजरत दर्गा आणि तौकीर रझा यांच्या घराबाहेर जमले. हे निदर्शक हातात "आय लव्ह मुहम्मद" लिहिलेले पोस्टर घेऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होते. प्रशासनाने या निषेधाला परवानगी नाकारल्याने परिस्थिती चिघळली. जमावाने "गुस्ताख-ए-नबी की एक ही सजाई, सर तन से जुदा" अशा घोषणांनी वातावरण पेटवले. पोलिसांच्या मते, यामागे रझा यांनी दिलेली भडकवणारी वक्तव्येच जबाबदार होती.

यानंतर जमावाने हिंसक रूप धारण केले. कोतवाली परिसर, आलमगीरपूर, सिव्हिल लाईन्स, बडा बाजार आणि बांस मंडीतील दुकाने जबरदस्ती बंद पाडण्यात आली. वाहनांवर दगडफेक, दुकाने उद्ध्वस्त करणे आणि पोलिसांवर थेट हल्ले करण्यात आले. पोलिसांची लाठ्या हिसकावून घेण्यात आल्या, गणवेश फाडण्यात आले, तर काचेच्या बाटल्यांमध्ये भरलेले पेट्रोल बॉम्ब पोलिसांवर फेकण्यात आले. धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला करण्यात आल्याने १० पोलिस गंभीर जखमी झाले. हिंसाचारानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रसाठा उघडकीस आला. तौकीर रझा यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब आणि विविध धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रकरणामागे पूर्वनियोजित कट होता. राज्यातील शांतता भंग करणे आणि विकास योजनांना अडथळा आणणे हा त्यामागील उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेत तौकीर रझा यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली असून, १० एफआयआरमध्ये २००० हून अधिक लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. बरेली पोलिसांनी इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, ९०-९५ टक्के लोक शांत होते, परंतु काही मोजक्या अशांत घटकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवली. प्रशासनाने तौकीर रझा यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे. नफीस नावाच्या सहकाऱ्याच्या मालकीचे मार्केट सील करण्याची नोटीस नगरपालिकेकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर पश्चिम उत्तर प्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. तौकीर रझा यांच्या कटकारस्थानाने संपूर्ण प्रदेशात खळबळ उडाली आहे.