१.९० कोटीचे अंमली पदार्थ नष्ट

शहर पोलिसांकडून जप्त मुद्देमाल

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
अमरावती,
amravati-drugs-destroyed : अमरावती शहर पोलिस आयुक्तायातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या ४७ गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला १ कोटी ७९ लाख ३६ हजार ३४० रुपयांचा ८९६.८१७ किलोग्राम गांजा, तसेच ५ गुन्ह्यातील १० लाख ७५ हजार २५० रुपयांचा २१५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ, असा एकूण ५२ गुन्ह्यातील एकूण १ कोटी ९० लाख ११ हजार ५९० रूपयांचा अंमली पदार्थ २९ सप्टेंबर रोजी अमरावतीच्या केंद्रीय गोदामातून नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीत नेऊन इंसीनेटरच्या मदतीने जाळून नष्ट करण्यात आला.
 
 
 
jkj
 
 
 
यामध्ये अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातील सन १९९६ पासून दाखल असलेल्या नागपुरी गेट पोलिस ठाण्यातील २६ केसेस, पोलिस ठाणे बडनेरा येथील ८ केसेस, पोलिस ठाणे गाडगेनगर येथील ११ केसेस, पोलिस ठाणे खोलापुरी गेट येथील ३ केसेस, पोलिस ठाणे नांदगाव पेठ येथील २ केसेसख पोलिस ठाणे फेजरपुरा येथील १ केस व पोलिस ठाणे वलगाव येथील १ केस, याप्रमाणे एकूण ५२ केसेस समाविष्ट होत्या. या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागलेला असल्याने त्या प्रकरणातील गांजा व एमडी मुद्देमाल नाश करण्याकरिता पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ, उपायुक्त श्याम घुगे आणि अन्य एक अधिकारी अशी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी प्राप्त करून हा सर्व मुद्देमाल नागपूर येथे नष्ट करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र एनव्हायरो पॉवरचे मॅनेजर, दोन पंच, पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांची उपस्थिती होती.
 
 
या प्रक्रियेत गुन्हे शाखा अमरावती शहराच्या पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे, उपनिरीक्षक कैलास सानप, कर्मचारी अजय मिश्रा, सुधीर गुडधे, संभाजी केद्रे, चालक नितीन लांडगे यांनी केली.