शिक्षकांनी नोंदणी अर्ज वेळेत दाखल करावे

-शिक्षक मतदार यादीची प्रक्रिया सुरू -६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
अमरावती, 
Amravati-Teacher : अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने याद्या तयार करण्यात येणार आहे. सर्व पात्र शिक्षकांनी वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
 
 
amt
 
 
 
मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये ३० सप्टेंबर रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत नमुना १९ द्वारे दावे स्वीकारण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल. यावरील दावे व हरकती २५ नोव्हेंबर २०२५ ते १० डिसेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येतील. २५ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढणे आणि पुरवणी यादी तयार करण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
 
 
लोकप्रतिनिधित्त्व अधिनियम १९५० च्या अधिनियम २७ (३) (ब) नुसार राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अर्हता दिनांकाच्या पूर्वीच्या लगतच्या ६ वर्षांमध्ये किमान ३ वर्ष पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. यासाठी पात्र शिक्षकांना सुधारित नमुना क्रमांक १९ मध्ये आवश्यक रहिवासाचा पुरावा व प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करता येईल.
 
 
निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशीष येरेकर आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यरत राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार पदनिर्देशित अधिकारी राहणार आहेत. अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी पात्र शिक्षकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी येरेकर यांनी केले आहे.
 
 
सर्वांनाच नव्याने नोंदणी अनिवार्य
 
 
-शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार आहे. यासाठी पूर्वी नोंदणी केलेली असली तरी यावेळी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीसाठी अर्ज पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करता येतील. एकगठ्ठा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख त्यांच्या संस्थेतील सर्व पात्र कर्मचार्‍यांचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील.