सिंदी (रेल्वे),
Banana orchard-storm : शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात आमगावचे शेतकरी विठ्ठल पवार यांच्या शेतातील केळीची एक हेटरमधील बाग उद्ध्वस्त झाली. त्यात २० किलोच्या घडासह झाडं भूईसपाट झालीत.
यंदा पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला. आडत-पाडत येणारा पाऊस शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊन गेला. पिकांसह जमिनीही खरडून गेल्या. त्यामुळे सध्या शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. अशातच शुक्रवारी सायंकाळी सिंदी परिसरात वादळ वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळात विठ्ठल पवार यांच्या एक हेटर शेतातील केळीची बाग उद्ध्वस्त झाली.
शेकडो झाडे वजनदार केळीच्या घडासह कोलमडून पडली. यात पवार कुटुंबाचे किमान ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पवार यांच्यासह गावकर्यांची केली आहे. विठ्ठल पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून यंदा प्रथमच त्यांनी केळीची शेती केली होती. मात्र, वादळी पावसाने त्यांचे अतोनात नुकसान केले आहे.