333 दिव्यज्योतीने उजळले चवडेश्‍वरी मंदिर

*शहरातील पुरातन मंदिरात नवरात्रोत्सवाची धुम * मातेच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
सुनिल कावळे
गडचिरोली, 
Chavdeshwari Temple : शहरातील रामपूरी वॉर्डात लिंगायत देवांग समाजाच्या मातृदेवता श्री चवडेश्‍वरी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मंदिरात मुख्य घटस्थापनासोबतच वैयक्तिक भाविकांच्या घटांचीही स्थापना केली जाते. यावर्षी 333 वैयक्तिक व प्रमुख घटस्थापना करण्यात आली आहे. या घाटांवर लावलेल्या दिव्य प्रकाशाने चवडेश्‍वरी मंदिर उजळून निघाले आहे.
 
 
 
JLK
 
 
 
शक्ती उपासनेचा महान पर्व नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्रीचे 9 दिवस भाविक माताराणीची पूजा करतात. गडचिरोली शहरातील लिंगायत देवांग समाजाचे पूजनीय चवडेश्‍वरी माता मंदिर आहे. शहरातील सर्वात जुने देवी मंदिर असल्याने नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. श्री चवडेश्‍वरी माता मंदिरात 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुख्य घटस्थापनाबरोबरच वैयक्तिक घटस्थापनाही मंदिरात होते. त्यामुळे यंदा चवडेश्‍वरी मंदिरात 333 भाविकांनी घटस्थापना केली आहे. या घटांवर लावलेल्या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाले आहे. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवादरम्यान येथे भाविकांची गर्दी कायम राहणार आहे. त्यामुळे भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी देवस्थान समिती व भाविक प्रयत्नशील आहे.
 
 
व्यक्तिगत घटनस्थापनेची परंपरा कायम
 
 
नवरात्रोत्सवात अनेक भाविकांना घटस्थापना करण्याची इच्छा असते. मात्र काही कारणांमुळे अनेकांना घटस्थापना करता येत नाही. त्यामुळे चवडेश्‍वरी माता मंदिरात वैयक्तिक घटस्थापनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैयक्तिक घटस्थापनेची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात अनेक भाविक मंदिरात घटस्थापना करतात. मागील वर्षी 303 घटांची स्थापना करण्यात आली होती़ यावर्षी यामध्ये वाढ होवून 333 घटांची स्थापना करण्यात आली़
 
 
ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी
 
 
चवडेश्‍वरी मंदिर हे शहरातील सर्वात जुने देवीचे मंदिर आहे. त्यामुळे भाविकांची चवडेश्‍वरी मातेवर अतूट श्रद्धा आहे. अनेक महिला भक्त देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. नवरात्रोत्सव कालावधित तर या मंदिरात महिला भाविकांची ओटी भरण्यासाठी अलोट गर्दी पहायला दिसून येते.