वर्धा,
Durgo Festival : शहरात नवरात्रोत्सवाचा उत्सव शिगेला पोहोचला असून देवी भतांच्या गर्दीने शहर दुमदुमले आहे. चौकाचौकात देवी मंडप, लंगर, महाप्रसादाचे आयोजन सुरू असताना परिसरातील गावांतील नागरिकही दर्शनासाठी वर्धेत दाखल होत आहे. त्यामुळे वाढलेल्या गर्दी व वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी शहरात काटेकोर नियोजन करून चोख बंदोबस्त उभारला आहे.
शहरात सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी जुनापानी नाका, धुनिवाले बाबा मठ, उड्डाणपूल व आरती चौकात पॉइंट ड्युटीवर अधिकारी-अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. १ ऑटोबरपासून देवी विसर्जन होणार असल्याने सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत शहरात अवजड वाहनांची व लहान वाहनांची मिरवणूक मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे. त्यासाठी बजाज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बॅरिकेड्स उभारण्यात येणार आहेत. या मार्गाऐवजी पर्यायी मार्ग बजाज चौक ते पोस्ट ऑफिस मार्गे जेल रोड आदित्य मेडिकल असा सुरू राहणार आहे.
मिरवणूक मार्ग बजाज चौक, निर्मल बेकरी चौक, सोशालिस्ट चौक, शिवाजी महाराज चौक, आरती चौक मार्गे पवनार विसर्जन स्थळ असेल. या मार्गावर गर्दी, लंगर व महाप्रसादाचे आयोजन असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे