शेतकऱ्यांना लगेच व्हावी मदत

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
 
अग्रलेख...
farmers helped ‘‘यावर्षी वावरात पिकांची शाळाच नाही डवरली
की निसर्गाने वावराची फीच नाही भरली...
अनुपस्थित पिकांचा सुनसान वर्ग दाखवतो...
चाल दोस्ता तुला महाराष्ट्र दाखवतो...’’
यंदाच्या पावसाने खरोखर कहर केला. महाराष्ट्राचा निम्मा खरीप हंगामच पाण्यात गेला. कोरडा दुष्काळ बघून-बघून डोळ्यांतील पाणी सुकलेल्या मराठवाड्यात यावर्षी अतिवृष्टीने अश्रूंचा मोठा बांधच फोडला. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाची स्थितीही काही वेगळी नाही. तब्बल 50 लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. अवघ्या महिनाभरात 26 लाख हेक्टर शेतजमिनीला कमालीचा फटका बसला. राज्यातील 42 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. ही अतिवृष्टी इतकी भयंकर आहे की, राज्याच्या ग्रामीण जीवनाची घडी बसायलाच पुढचे किमान वर्ष तरी लागेलच. गावखेड्यांची अवघी अर्थव्यवस्थाच या पावसाने उद्ध्वस्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दर्शविला होता. पण एवढाही चांगला पाऊस बळीराजाला अपेक्षित नव्हता बघा!
 

शेतकरी  
 
 
यंदाच्या पावसाने असा काही धुमाकूळ घातला की बव्हंशी महाराष्ट्रात असा कुठलाच भाग शिल्लक राहिला नाही, जेथे नुकसान झाले नाही. अगदी मे महिन्याच्या मध्यात सुरू झालेला हा पाऊस लांबतच गेला. केवळ लांबलाच नाही तर अगदी धुंवाधार, कोसळधार बरसत राहिला. परतीचा म्हणता म्हणता तो अद्याप परतलेलाच नाही. आताश: ढग दाटून आले की शेतकरी धास्तावतो, एवढी दहशत या पावसाने या राज्याच्या भूमीवर पसरवली आहे. ती इतकी पसरली की जिकडे पाहावे, तिकडे पाणीच पाणी दिसू लागले. शेतात, बांधात, रस्त्यावरील खड्ड्यांत, तुंबलेल्या नदी-नाल्यांत आणि धरणातून ओसंडून वाहत गावच्या आणि शहरांच्या वस्त्यांतही अगदी अगतिक करणारे पाणीच पाणी...
या मुसळधार पावसाने सर्वांत जास्त नुकसान केले ते शेतीचे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अनावश्यक व अवकाळी पावसाने हिरावून घेतला. अवघ्या राज्याचे नुकसान झालेच. त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्याला जास्तच फटका बसला. या दोन्ही विभागांत कापूस आणि सोयाबीनचे पीक हातचे गेले, तर इतर पिकेही सडून गेली आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने तर हे नुकसान आणखीच वाढले. एकट्या नाशिक जिल्ह्यात 15 हजार हेक्टरच्या वरील पीक नष्ट झाल्याची नोंद आहे. कापूस, सोयाबीन, भात (धान), मका, कांदा, तूर, मूग, उडीद, ऊस, भाजीपाला आणि फळपिके यासह खरीप हंगामातील जवळजवळ साऱ्याच पिकांना या पावसाचा तडाखा बसला आहे. पिकांच्या नुकसानीसोबतच शेतकèयांचे सारे आर्थिक गणितच पूर्णपणे बिघडले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे सडून गेली आहेत. पंढरपूर परिसरात एकरी लाखो रुपये खर्च करून लावलेल्या शेवगा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, झेंडूची फुलेही कोमेजली. येणारा काळ दसरा-दिवाळीचा आहे. या सणासुदीच्या काळात मिळणारा नगदी व अपेक्षित दर आता शेतकऱ्यांना मिळणार नाहीच. शिवाय महागाई वाढेल त्याची समस्या वेगळीच. या बिकट परिस्थितीने बळीराजाचे प्राण कंठात आले आहे. अगदी गहिवरून यावे अशी ही स्थिती आहे.
यंदाच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस झाला. विदर्भ, मराठवाड्यात प्रत्येकी पाच आठवडे अतिप्रमाणात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात चार, तर कोकणात दोन आठवडे अतिवृष्टी झाली. जणू काही ढगफुटी झाली. शेतात झुलणारी पिके ती सहन करू शकली नाही. ती पार आडवी झाली. नदी-नाल्यांना आलेल्या पुराने तर हजारो हेक्टर शेतजमीन खरडून गेली. एका पावसात दाणादाण उडावी असेच काहीसे झाले.farmers helped खरडलेल्या जमिनीवर आक्रोश करणारे अनेक शेतकरी आपण दूरचित्रवाणीवर बघितले. शहरी लोकांसाठी ही गोष्ट छोटी दिसत असली तरी बळीराजासाठी हे संकट डोंगराएवढे मोठे आहे. आपल्या कुटुंबाचे आता काय होईल या चिंतेने त्याचे अवसान गळून गेले आहे. शेतीसाठी लावलेला खर्चही निघणार नाही हे शेतकऱ्यांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे त्याच्या पोटाला चिमटा तर बसणारच आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा खडू-फळा बंद होणार आहे. शिक्षणाला फटका बसणार आहे. मुलींची लग्ने पुढे ढकलली जाणार आहेत. आपल्या चिमुकल्यांच्या केविलवाण्या चेहèयांकडे बघत असताना बळीराजाला कसे वाटत असेल, याची कल्पनाही करायचे धारिष्ट्य होत नाही. आता पुन्हा कर्जाचा डोंगर वाढेल हे शेतकऱ्यांना कळले आहे. पूर्वीच्या कर्जाचे हप्ते मागायला बँकेचे अधिकारी घरावर चालून येतील. त्यांचा तगादा मोठा तापदायक असेल हेही त्याला एव्हाना कळले आहे. ही भयाण परिस्थिती अचानक दत्त म्हणून उभी राहिल्याने शेतकèयांची पाचावर धारण बसली आहे. काळजाचे पाणी झाले आहे. डोळ्यादेखत गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. घरात पाणी शिरल्याने घरातील भांडीकुंडी, कपडेलत्ते, अंथरूण, पांघरूण, धान्य आणि मुलांच्या अभ्यासाचे दप्तरही पुराच्या पाण्याने भिजून पार चिखल झाले. गंगामाई नाचून गेली असावी तसे झाले... आता केवळ गाळ तेवढा उरला आहे. पिके तर गेलीच, सोबत जमिनीची मातीही खरडून गेली. जगण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेले नाही. आम्ही दोष कुणाला देणार, असा प्रश्न ते स्वत:ला विचारत आहेत आणि त्याच वेळी मदतीची अपेक्षाही बाळगून आहेत. अशा स्थितीत शेतकèयांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून नको ती पावले उचलली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गतकाळात असे घडले आहे. आधीच शेती परवडत नाही आणि असा फटका बसला तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा संघर्ष फारच कठीण होतो. तसे घडता कामा नये याची काळजी मायबाप सरकारने घेतली पाहिजे. तशी सुरुवात झालेली आहे हे चांगलेच. अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करूच, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेच. मदतीसाठी यंत्रणेलाही सक्रिय केले गेले आहे. 61.64 लाख शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी 1829 कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरितही करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ही मदत पुरेशी नाही, हे आताच समजून घेतले पाहिजे. कारण नुकसान आभाळाएवढे आहे. केंद्राकडे राज्याकडून मदतीसाठी प्रस्ताव गेला आहे. केंद्र सरकारही मदत करेलच. ती केलीच पाहिजे. कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यंदा पुरेशा मदतीची गरज असल्याचे केंद्र व राज्य सरकारने समजून घेतले पाहिजे. राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव आहेच. पण ती मूर्त स्वरूपात दिसण्याची ही वेळ आहे. मदतीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण लगेच सुरू झाले पाहिजे. कारण दिवाळीचा आगाज झाला आहे. दसरा तोंडावर आहे.farmers helped मदतीचा पुढचा टप्पा पोहोचेपर्यंत बळीराजा आणि त्याचे कुटुंब तग धरू शकेल, याची तजवीज करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा राबविली गेली पाहिजे. याशिवाय, हा विषय सरकारपुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांसाठी धावून जाण्याची जबाबदारी समाजानेही घेतली पाहिजे. समाजातूनही मदतीचा ओघ सुरू झाला पाहिजे. जेथे जास्त नुकसान झाले आहे, त्या परिसरातील अशासकीय संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, दानशूरांनी पुढे येऊन जगाच्या पोशिंद्याला धीर दिला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती मदतीची आणि औदार्याची आहे. यापुढे अशी स्थिती पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणूनही आता नव्याने विचार केला गेला पाहिजे. नद्या जोडण्याचा प्रकल्प त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल समजायला हरकत नाही. या प्रकल्पाने अशी भयाण पूरपरिस्थिती येण्याची शक्यता मावळणार आहे आणि म्हणून हा प्रकल्प जास्त महत्त्वाचा ठरतो. अशा पायाभूत प्रकल्पांकडे लक्ष दिले गेले तर हळूहळू सारे काही ठीक होईल. इतर क्षेत्रांसोबत शेतीही सुधारेल आणि शेतकरीही संकटातून तगत राहील.