ओटावा,
Lawrence Bishnoi gang in Canada कॅनडा सरकारने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत तिला अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी सोमवारी ही घोषणा केली. सरकारच्या माहितीनुसार, बिश्नोई टोळीवर कॅनडामधील एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे आरोप आहेत. या कारवाईनंतर कॅनेडियन फौजदारी संहितेनुसार टोळीची मालमत्ता, वाहने, आर्थिक व्यवहार गोठवले जाऊ शकतात किंवा जप्त केले जाऊ शकतात. तसेच, कायदा अंमलबजावणी संस्थांना टोळीविरुद्ध दहशतवादी गुन्ह्यांचा खटला चालवण्याचे अधिक अधिकार मिळतील.
कॅनडा सरकारने आपल्या प्रेस निवेदनात म्हटले आहे की बिश्नोई टोळी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय गुन्हेगारी संघटना आहे, ज्यांची मुळे मुख्यत्वे भारतात आहेत. Lawrence Bishnoi gang in Canada स्थलांतरित समुदाय मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या भागांमध्ये ही टोळी सक्रिय असून खून, गोळीबार, जाळपोळ, खंडणी आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कॅनडा सरकारने स्पष्ट केले की ही टोळी प्रमुख समुदाय नेते, व्यापारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना लक्ष्य करून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळेच त्यांना दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कॅनडातील सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर संस्था आणि कायदा अंमलबजावणी विभागांना या टोळीच्या गुन्ह्यांना आळा घालता येईल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असे सरकारने सांगितले.