नागपूर,
Maharashtra Forest Department : महाराष्ट्र वन विभागाच्या इतिहासातील पहिल्या महिला वनप्रमुख आयएफएस शोमिता बिस्वास मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव यांच्याकडे सोपविला.
सिव्हील लाइन्स येथील वनभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मावळत्या प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांना निरोप प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने वन विभागाचे प्रमुख अधिकारी संजीव गौर, श्रीनिवास रेड्डी, ऋषिकेश रंजन, प्रविण चव्हाण, नरेश झुरमुरे, पी. कल्याणकुमार आदी उपस्थित होते.
वनविभागाला दिली नवी ओळख
महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शोमिता बिश्वास या 1988 बॅचच्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी होत्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे झाली आहेत. केंद्र सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर अत्यंत महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. सक्षमतेने प्रशासन चालवण्याच्या प्रदीर्घ अनुभवामुळे वनविभागाला त्यांनी नवीन ओळख निर्माण करून दिली, असे स्पष्ट प्रतिपादन वन अधिकारी नरेश झुरमुरे यांनी याप्रसंगी केले.
वनविभागाला लोकाभिमुख करण्याचा मानस
नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानासारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून वनविभागाला अधिक लोकाभिमुख करण्याचा मानस नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव यांनी व्यक्त केला.
मी विविध पदांवर गत 37 वर्षे सेवा दिल्यानंतर आज वनविभागातून सेवानिवृत्त होत आहे. माझ्याकरिता महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे. दरम्यानच्या काळात वन विभागाचे कामकाज गतीमान करण्याचा प्रयत्न निश्चितच केला. शोमिता बिश्वास
सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक