हिंगणघाट,
Sameer Kunawar : शुक्रवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला व नवजात बालकांच्या आंतररुग्ण कक्षात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक संतप्त झाले. अव्यवस्थेच्या अनुषंगाने सोमवार २९ रोजी आ. समीर कुणावार यांनी आरोग्य विभाग तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेत कान उघाडणी केली. शुक्रवारी रुग्ण व नातेवाईकांना झालेला त्रास रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांच्या चांगलाच अंगलट येणार असून अव्यवस्थेला जबाबदार कर्मचार्यांवर कारवाईचे संकेत आ. कुणावार यांनी दिले.
या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार योगेश शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता पि. आर. घुरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत धमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिल नायक, ठाणेदार देवेंद्र ठाकूर, डॉ. लांडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आ. कुणावार यांनी तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकार्यांना निर्देश देत त्यांनी झालेल्या प्रकाराला जबाबदार असणार्या अधिकारी, कर्मचार्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी नागरिकांनी आरोग्य प्रशासनावर तसेच महावितरणच्या अधिकार्यांवर वीज पुरवठा खंडित का झाला, असा संतप्त सवाल करीत रोष व्यत करीत रुग्णालयातील अव्यवस्थेचा पाढा वाचला. आ. कुणावार यांनी कोरोना काळात मोठे जनरेटर उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून दिले होते. परंतु, जनरेटर सुरू करण्यात आले नव्हते. येथील काही शौचालय कुलूपबंद स्थितीत होते तर इतर शौचालयात मुंग्या माकोड्यांचा प्रकोप होता. औषधांचा पुरेसा साठा नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. आ. कुणावार यांनी कार्यकर्त्यांची दखल घेत सर्वच दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांना करणार अवगत : आ. कुणावार
या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश आ. कुणावार यांना दिले. येथील अव्यवस्थेचा प्रकार मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या कानावर घालून कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे आ. कुणावार यांनी स्पष्ट केले.