गडचिरोली, 30 सप्टेंबर
Milind Narote : केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी राबविण्यात येणार्या महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती दिली. महिला व बालकल्याण, मातृत्व सुरक्षा, पोषण आहार, उज्ज्वला योजना, घरकुल, जलजीवन मिशन या योजनांसोबतच स्वयंसहायता बचत गट व ‘लखपती दीदी’ सारख्या उपक्रमांमुळे महिला आत्मनिर्भर बनत असून त्यांच्या हातात आर्थिक सबलीकरणाची किल्ली आली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चामोर्शी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने तालुकास्तरीय महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास आमदार डॉ. मिलिंद नरोटे उद्घाटक म्हणून बोलत होते. पूढे आमदार डॉ. नरोटे म्हणाले की, महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार सतत कटिबद्ध आहे. प्रत्येक महिलांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. बचत गटांमुळे ग्रामीण भागातील महिलांना छोट्या-मोठ्या उद्योगांची संधी मिळत आहे आणि लखपती दीदी योजनेमुळे महिला खर्या अर्थाने सबलीकरणाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांच्या कौशल्याला वाव मिळून त्यांना रोजगारनिर्मितीचे साधन उपलब्ध होईल, असे आमदार नरोटे यांनी नमूद केले. अंगणवाडी सेविकांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाचे त्यांनी विशेष कौतुक करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा मेळावा महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात अंगणवाडी सेविकांकडून विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. रानमेव्याचे पदार्थ तसेच त्यापासून बनवलेले पारंपरिक व पौष्टिक खाद्यपदार्थ यांची मांडणी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, निरज रामानुजनवार, नरेश अलसावार, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर, गटविकास अधिकारी माधुरीताई येरमे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्रा पेद्दाल्ला, आमगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली कराडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.