वर्धा,
slaughter-buffalo-rescue : आयशर ट्रकमध्ये कोंबून जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केळझर येथे नाकेबंदी करून ४ म्हशी व १६ हेल्यांची सुटका केली. याप्रकरणी जनावरांसह १७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत गस्तीवर असलेल्या पथकाला एम. एच. १६ सी. सी. ०२९० क्रमांकाच्या वाहनाने नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांना देण्यात आली. जैन यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिलेल्या निर्देशाप्रमाणे गोपनियता बाळगून केळझर येथे नाकेबंदी करण्यात आली. वाहन थांबताच चालकाची विचारपूस केली असता शेख मुस्ताफ शेख शौकत (३७) रा. तिरंगा चौक धुळे ह. मु. शेख दिलाव याच्या घरी भाड्याने राहत असल्याचे सांगितले. त्याच्या सोबत शेख रशिद, नगर, मालेगाव, जि. नाशिक व लिनर अल्ताफ अहमद मुस्ताफ अहमद कुरेशी (३९) रा. मदन चौक गांधीनगर कामठी व वकील अहमद टेका नाका नई बस्ती नागपूर (पसार) असे सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता चार म्हशी आणि १६ हेले आढळून आले. दरम्यान, गुन्हे शोध पथकाने जनावरांची सुटका करीत आयशर कंपनीचा मालवाहू आणि जनावरे असा १७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरांच्या चारापाण्याकरिता तसेच वैद्यकीय तपासणीकरिता सर्वोदय गोशाळा चारिटवान ट्रस्ट पडेगाव येथे पाठविण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, नरेंद्र पाराशर, सागर भोसले, मिथून जिचकार, दीपक साठे, अखिल इंगळे आदींनी केली.