लक्ष देण्याची गरज

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
 वेध
countrys internal security देशाच्या सीमांवर आपले लष्कर अगदी डोळ्यात तेल घालून शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. देशाबाहेरून होणारी घुसखोरी, दहशतवादी हल्ले यांना आपल्या तिन्ही दलांचे जवान चोख उत्तर देत असतात, हे नुकत्याच घडलेल्या पहेलगाम घटनेनंतर केलेल्या ऑपरेशन सिंदूरने स्पष्ट झाले आहे. पण, देशाच्या आंतरिक सुरक्षेकडेही त्याहीपेक्षा जास्त सजग राहून समाजकंटकांचे मनसुबे नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.
 
 

internal security  
 
 
अशी गरज आज व्यक्त करावीशी वाटली कारण, मागच्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव आणि शेगाव या तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच ते सात जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या घरांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 60 तलवारी जप्त करण्यात आल्या. या तलवारी म्हणजे काही भाजी चिरण्याच्या चाकूसारख्या नव्हत्या. मोठ्या होत्या. तर नागपूर शहरात केलेल्या कारवाईत एक अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे जप्त करून ते बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली. यापूर्वी 20 नोव्हेंबर 2021 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी या छोट्याशा गावात झारखंडच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून तेथे शस्त्र निर्मिती करणाऱ्या व ते विकत घेणाऱ्यांना पकडले होते. त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे देखील झारखंड दशहतवाद विरोधी पथकाने नंतर स्पष्ट केले होते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जा. तालुक्याचा काही भाग सातपुडा पहाड आणि अंबाबरवा अभयारण्य असून त्याला लागूनच मध्य प्रदेशची सीमा आहे. या परिसरात शस्त्र तयार करणारे घनदाट जंगल आणि दोन राज्यांच्या सीमावर्ती भागाचा फायदा घेऊन शस्त्रनिर्मिती व विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारवाई करणे हे महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. तर, आता हे शस्त्र खरेदी-विक्री व विनापरवाना बाळगण्याचे लोण अगदी शेगाव, खामगाव, नांदुरा यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचले आहे. नांदुरा येथे 14 तलवारी जप्त केल्यानंतर दोन दिवसांनीच स्थानिक गुन्हे शाखेने खामगाव येथे कारवाई केली होती. त्या कारवाईत 30 च्यावर तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. त्या तलवारी नांदुरा येथे पकडलेल्या व्यक्तीकडून आणल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. सध्या काही समाज विघातक घटकांकडून देशातील शांतता व कायदा सुव्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावरून दिसून येते.countrys internal security त्यातच बांगलादेशी घुसखोर देशातील अनेक छोट्या छोट्या शहरातून वास्तव्य करीत असल्याचे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या शोध मोहिमेत स्पष्ट झाले आहे. तेव्हा, समाजाने देखील सजग राहिले पाहिजे. आपल्या परिसरात, मोहल्ल्यात भाजी विकण्यासाठी व इतर वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या अनोळखी फेरीवाल्यांवर लक्ष ठेवून त्यांची चौकशी केली पाहिजे. त्याबाबत काही संशय असल्यास पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे. तसेच, शेगावसारख्या शांतताप्रिय शहरात तलवारी आढळणे हे संभाव्य धोक्याची चाहूल म्हणावी लागेल. शेगाव हे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे देशभरातून लाखो भाविक येतात. अशा गर्दीच्या ठिकाणी समाजविघातक घटकांकडून काही अप्रिय घटना घडविण्याची योजना या मागे नाही ना? याची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, या कारवाईत अटक करण्यात आलेले हे 20 ते 30 वयोगटातील आहेत. या वयात काहीतरी करून दाखविण्याची खुमखुमी असते. त्यातून त्यांच्या डोक्यात काही अप्रिय विचारांची पेरणी देखील केली जाऊ शकते. शहरात विविध वस्तू किंवा साहित्य विकण्यासाठी बाहेरगावहून येणाऱ्या फेरीवाल्यांना शहरात शिरण्यापूर्वी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागत होती. त्यामुळे शहरात कोण नवीन माणूस आज येऊन गेला किंवा वास्तव्यास आहे याची नोंद पोलिसांकडे राहत होती. आज ही व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, माहीत नाही. जर नसेल तर, ती पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. तसेच, आंतरिक सुरक्षेबाबत केवळ पोलिसांवर सर्व भार सोपवून चालणार नाही. तर, नागरिकांनी देखील आपल्या परिसरात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तीची चौकशी करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. तसेच, स्थानिक गुन्हे शाखा, सीआयडी व इतर गुप्तचर विभागांनी मागच्या आठवड्यात जप्त केलेला शस्त्रसाठा कोणत्या उद्देशाने करण्यात आला होता, याची चौकशी करून त्याच्या मुळाचा शोध लावून त्या मागे असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. खामगाव शहराची काही वर्षांपूर्वी पोलिस दप्तरी अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद होती. जातीय दंगली व संचारबंदीचा फटका खामगावकरांनी अनुभवला आहे.countrys internal security त्याची फार मोठी किंमत या शहराला मोजावी लागली आहे. त्या अनुभवातून शहाणे होऊन या शहराने आपल्या कपाळी लागलेला हा कलंक गेल्या काही वर्षात पुसून टाकला आहे. मात्र, शहरात सापडलेल्या तलवारींवरून पुन्हा खामगाव ये रे माझ्या मागल्या सारखे वागणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तेव्हा, पोलिसांनी आंतरिक सुरक्षेबाबत अधिक सजग राहून देशविघातक शक्तींना हुडकून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तर, नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा यानिमित्ताने करावीशी वाटते.
 
विजय कुळकर्णी
8806006149