आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
रिसोड, 
Tribal community-Virat Morcha : धनगर, वंजारी तसेच बंजारा समाजाला अनुसुचीत जमातीमध्ये समाविष्ट न करणे तसेच सदर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण लागु करु नये या मागणीसाठी रिसोड शहरात २९ सप्टेंबर रोजी भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये आदिवासी समाजाचे महिला पुरुष लहान मुले वयोवृद्ध सामील झाले होते. यामध्ये आदिवासी समाजाचे पारंपारिक पोशाख परिधान करून युवकांनी लक्ष वेधले. मोर्चाची सुरुवात नगरपरिषद जवळून होत सिव्हिल लाईन मार्गे तहसील कार्यालयावर धडकले. या ठिकाणी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
 
 
MORCHA
 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करुन आरक्षण लागू करण्याबाबत धनगर, बंजारा तसेच वजारी हया जाती विविध मार्गाचा अवलंब करीत आहेत. त्यापैकी बंजारा समाजाने मराठा समाजाप्रमाणे हैद्राबाद गॅझेटचा आधार घेत अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची शासनाकडे विविध मार्गाने मागणी केलेली आहे. १९५० चच्या हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये कुठेही उल्लेख नाही तसेच सन १९५२ च्या हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी मध्ये समाविष्ट असल्याचे दिसत आहे. मग हा समाज हैद्राबाद गॅझेटनुसार आम्हाला सुध्दा अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करा असे का म्हणतो, हे सर्व चुकीचे आहे. त्यामुळे ईतरही समाज (धनगर, बंजारी) अनुसुचित जमातीमध्ये आमच्या जातीचा समावेश करावा याकरिता मोर्चे व निदर्शने करीत आहे. अनुसूचित जमातीमध्ये पुर्वी ४७ जातीचा समावेश होता. सध्यःस्थितीत ४५ जातीचा समावेश अनुसुचित जमातीमध्ये आहे आणि त्यातही ईतर समाजही अनुसुचीत जमातीमध्ये आरक्षणाची मागणी करीत आहे की जे असंविधानिक आहे.
 
 
धनगर बंजारा वंजारी समाजाच्या अनुसूचीत जामतीमध्ये समाविष्ट होण्याच्या मागण्या मंजुर केल्यास आमच्या आदिवासी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्यामुळे होणार्‍या परिणामास शासनच जबाबदार राहिल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार संतोष टारफे यांनी मोर्चाला संबोधित केले. सदर मोर्चाचे नियोजन आदिवासी युवक कल्याण संघ, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यावतीने करण्यात आले होते. सदर मोर्चात प्रामुख्याने संतोष टारपे माजी आमदार, सतीश पाचपुते माजी जि प सदस्य, महादेव डाखोरे, बाबाराव गोदमले, अविनाश पंधरे, आनंद पवार, ओंकार सरकुटे यांच्यासह हजारोच्या संख्येने आदीवासी बांधव सहभागी झाले होते.