वरोड्यात शेतकर्‍यांचे जेलभरो आंदोलन

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
वरोडा,
farmers-jail-bharo-agitation : अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असताना शासनाकडून भरीव मदत मिळावी याकरिता वरोड्यात मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावर प्रशासनाच्या वतीने कुठलाही तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्ते उपविभागीय कार्यालयाच्या आवारात सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या मांडून बसले होते.
 
 
 
JH
 
 
 
शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात मंगळवारला आनंदवन चौकामध्ये जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, पंजाब राज्याप्रमाणे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, पिक विमाधारकांना कुठलीही अट ठेवू नये व सरसकट पिक विमा देण्यात यावा, या मागण्यांकरिता जेलभरो आंदोलन करण्यात आले.
 
 
आनंदवन चौकात आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिस ठाण्याकडे कूच केली. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वारावर त्यांना अडविले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयात धाव घेतली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ठाण मांडून बसले होते. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने तोडगा न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर पायदळ मोर्चा काढणार असल्याचे नितीन मत्ते याप्रसंगी म्हणाले.
 
 
वरोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नियोजित आंदोलन होणार होते. परंतु, नितीन मत्ते यांना 30 सप्टेंबर रोजी वरोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहू नये, तर किशोर डुकरे यांना 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत वरोडा पोलिस ठाण्यामध्ये राहू नये, अशी प्रशासनाने नोटीस बजवली होती. त्यामुळे अचानक आंदोलनकर्त्यांनी स्थळ बदलून आंदोलन आनंदवन चौकात सुरू केले.