चंद्रपूर,
chandrapur-december-polluted : चंद्रपूर शहरात डिसेंबरच्या 31 दिवसांपैकी 27 दिवस मध्यम प्रदूषण, 2 दिवस जास्त प्रदूषण, तर केवळ एकच दिवस समाधानकारक आणि चांगले असे वातावरण जनतेला लाभले! एकूण डिसेंबर महिन्यात प्रदूषणात वाढच झाली असून, थंडीचा प्रभाव असल्याने वाहतूक, वाहने, कचरा ज्वलन आणि बायो मास बर्निंगमुळे ही वाढ झाली असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीतकमी 3, तर जास्तीत जास्त 8 प्रदुषकांना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण, 2.5 ते 10 आणि ओझोन, कार्बन मोनोक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड, अमोनिया, लीड या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. चंद्रपुरात 29 दिवस धूलिकण 10 असून, मात्र 1 दिवसच धूलिकण 2.5 एवढे होते. याचा अर्थ या महिन्यात धूलिकण, कचरा ज्वलन आणि वाहनांमुळे प्रदूषण वाढले असल्याचे जाणवते.
*0-50 एक्यूआय निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. तो येथे 1 दिवसच चांगला आढळला.
*51-100 एक्यूआय निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते. येथे केवळ 1 दिवसच तो समाधानकारक आहे.
*101-200 एक्यूआय निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो. येथे 27 दिवस प्रदूषित श्रेणीत आहेत.
*201-300 एक्यूआय निर्देशांक असून जास्त प्रदुषित मानला जातो. येथे 2 दिवस खराब श्रेणीत आहे.
*301-400 एक्यूआय निर्देशांक हा अति प्रदूषित मनाला जातो. येथे एकही दिवस असा नाही.
*401-500 एक्यूआय निर्देशांक हे धोकादायक प्रदूषण मानले जाते. असा एकही दिवस नाही.
प्रदुषणाची कारणे
थर्मल पॉवर प्लांट, उद्योग, घरगुती कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे.
प्रदुषणामुळे रोगराईत वाढ
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडीमुळे आणि संथ वार्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे. परंतु, अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधीच श्वसनाचा रोग असणार्यांना हानिकारक असते. तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, ब्रॉकाय टिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात.