मुंबई,
Kapil Sharma लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्माने नववर्षाच्या स्वागतापूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कॅनडामधील कॅफेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर कपिलने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत दुबईत आणखी एका कॅफेचे उद्घाटन केले आहे. विशेष म्हणजे हा कॅफे ३१ डिसेंबरपासून ग्राहकांसाठी खुला होणार असून, दुबईत राहणारे किंवा सहलीसाठी जाणारे पर्यटक येथे भेट देऊ शकणार आहेत.
कपिल शर्माने Kapil Sharma सोशल मीडियावरून दुबईतील नव्या कॅफेची अधिकृत घोषणा केली. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॅफेचा आकर्षक अंतर्गत भाग दिसत असून, कपिल स्वतः ग्राहकांना कॉफी देताना दिसतो. या व्हिडिओसोबत त्याने, “हबीबी… तुमच्या कॅप्स कॅफेमध्ये स्वागत आहे. ३१ डिसेंबर रोजी दुबईमध्ये लॉन्च होत आहे,” असे कॅप्शन दिले आहे. कपिलने दिलेल्या माहितीनुसार, हा कॅफे दुपारी ४ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत पाहुण्यांसाठी खुला असेल.
कपिलच्या या Kapil Sharma घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विनोदी कलाकार भारती सिंगनेही कपिलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत, “माझ्या भावाला आणि वहिनीला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया,” अशा शब्दांत अभिनंदन केले आहे.दरम्यान, याच वर्षी कपिल शर्माचा कॅनडामधील कॅफे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. कॅफे सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच तेथे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या. १० जुलै, ७ ऑगस्ट आणि १५ ऑक्टोबर रोजी असे तीन हल्ले झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये कॅफेमधील लोक घाबरून पळताना दिसत होते. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचेही समोर आले होते.या पार्श्वभूमीवर दुबईतील नव्या कॅफेमुळे कपिल शर्माच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हा कॅफे खास आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.