कुणाच्या शिरपेचात नगरउपाध्यपदाचा ताज?

राजकीय घडामोडींना वेग

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia Municipal Council, येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाकरीता राजकीय घडामोडीला वेग आला आहे. कोणाला कोणते पद मिळणार यापेक्षा ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 

Gondia Municipal Council, 
गोंदिया नगरपरिषदेसाठी २ व २० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतगणना झाली. येथील नगराध्यक्ष पदासह २२ प्रभागातील ४४ अशा ४५ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. नगराध्यपदी काँग्रेसचे सचिन शेंडे यांची निवड झाली. त्यांनी भाजपाचे कशिश जायस्वाल यांचा दारून पराभव केला. नगरपरिषदेत मतदारांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नाही. येथे भाजपाचे १८ नगरसेवक, काँग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे ५, शिवसेना उबाठा गटाचे २, बसपा २ व अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. अध्यापही नगरपरिषदेत सत्ता स्थापन झाली नाही. १५ जानेवारी रोजी प्रथम सभा होत आहे. सभेत उपाध्यक्षाची निवड व विषय समित्या तसेच स्वीकृत सदस्य तसेच उपाध्यक्षांकडे कोणत्या समित्या देण्यात येतील, या व इतर महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात सभेत चर्चा होणार असल्याचे सांगीतले जाते. सभेचे पीठाशीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष व सचिव म्हणून मुख्याधिकारी संदीप बोरकर काम पाहतील. विशेष म्हणजे उपाध्यक्ष पदाच्या व स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षाला मतदान करण्याचा अधिकार असल्याने ४४ सदस्यांमधून कोण कशा पद्धतीने बहुमताचा आकडा पार पाडू शकेल. संख्या बळानुसार ५ स्वीकृत सदस्यांची निवड करणे आहे. पक्षांच्या संख्या बळानुसार भाजपा व काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर एक सदस्य राष्ट्रवादीचा असू शकतो. नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या विविध पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढताना स्वतंत्रपणे एक दुसर्‍यांच्या विरोधात निवडणूक लढविली असल्याने व नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पक्षातील अंतर्गत हेवेदावे, तिकीट वाटपातील अडथळे, तसेच निवडणुकीत गटबाजीचे व पाडापाडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळाले. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यपदाची निवडणुकीत कोण कोणाशी युती करेल हे गुलदस्त्यात आहे. यासंदर्भात सध्या तरी कोणाचीही भूमिका स्पष्ट केली नाही. अपक्ष निवडून आलेल्या तीन व बसपा, उबाठा गटाचे प्रत्येकी दोन सदस्य कुणाकडे झुकणार तसेच कोण कोणाशी युती करणार, यासंदर्भात राजकीय घडामोडीला, आर्थिक उलाढालीला, गटबाजी व पक्षीय बांधणीला कमालीचा वेग आला आहे. कोण गटनेता, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य होणार, तसेच पुढील काळात होणार्‍या सभापती पदाच्या निवडणुका होत असल्याने राजकीय तसेच बेरीज वजाबाकीच्या आकड्यांच्या खेळाची समीकरणाची जळवाजुळव सूरू असून शहरात राजकीय चर्चांना उधान आले आहे. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या होणार असल्याचे संकेत आहेत.
पात्रतेतून होणार स्वीकृत सदस्यांची निवड!
नगरपरिषदेचे अध्यक्ष व ४४ सदस्य अशा ४५ सदस्यांकडून ५ स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. यासाठी विविध गट तथा बहुमताच्या जोरावर सदस्याच्या निवडीचा विषय होण्याची शक्यता आहे. पालिकेचे स्वीकृत सदस्य होण्यासाठी नोंदणीकृत वैद्यक व्यवसायाची, मुख्याध्यापक प्राध्यापक तथा अधिव्याख्याता, या सनदी लेखापाल किंवा कॉस्ट लेखापाल, जिल्हा नोंदणी विद्यापीठाचे अभियंत्रीकी पदवी तथा प्राध्यापक, जिल्हा विधी व्यवसाय तथा कायद्यातील पदवी, सेवानिवृत्त मुख्याधिकारी, सहायक आयुक्त, उप आयुक्त अशा पदावर किमान पाच वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तीची किंवा सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० खालील मान्यताप्राप्त संघटनेचा सभासद किंवा पाच वर्षे काम केलेल्या व्यक्तींची स्वीकृत सदस्य पदावर निवड केली जाणार असल्याची माहिती आहे.