स्वतःतील क्षमता ओळखत घ्या उंच भरारी

- एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन - रातुम नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नागपूर,
aiims nagpur स्वतःतील क्षमतेवर दृढ विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले, तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, असे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी राजनगर येथील नॅशनल फायर सर्विस कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला.

AIIm  
 
 
दीक्षांत भाषण करताना डॉ. पंढरे यांनी या विद्यापीठाने देशाला राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, मंत्री, साहित्यिक व समाजसेवक दिले असून त्यावरूनच विद्यापीठाचा लौकिक अधोरेखित होत असल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत भयाच्या आणि मोहाच्या सापळ्यातून सुटका करून देण्याचे प्रयत्न केले तर विद्यार्थी आणखीन उंच भरारी घेतील असे ठाम मत व्यक्त केले.
दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनंत पंढरे तर कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते. या समारंभात अर्थशास्त्र विषयातील ९५ वर्षीय डॉ. विनायक किसनराव पांडे यांच्यावतीने मकरंद पांडे यांनी डि.लीट. पदवी स्वीकारली, तर भूगोल विषयात डॉ. दीपक महादेवराव वानखेडे यांना डि.लीट. पदवी प्रदान करण्यात आली.aiims nagpur तसेच वयाच्या ६५ वर्षांनंतर आचार्य पदवी मिळविल्याबद्दल घनश्याम विठोबा मांगे यांना योगतज्ज्ञ डॉ. विठ्ठलराव जिभकाटे पुरस्काराने गौरविण्यात आले.
कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजहित, पर्यावरण संरक्षण व समतेसाठी करावा, असे आवाहन केले. या दीक्षांत समारंभात एकूण ६१ हजार ८७१ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या, तर २७९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच १४० गुणवंत विद्यार्थ्यांना २२९ विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.