अकोला,
Akola cyber police, शहरातील एका व्यक्तीची ९० लाख २४ हजार ८७० लाखांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस दिल्ली येथून अकोला सायबर पोलिसांनी अटक केली.जहीद गणी मिर्चा (३६) रा.बारामुला (जम्मू कश्मीर)असे आरोपीचे नाव आहे.गुरुवार, ८ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी येथे हजर केले असता न्यायालयाने १९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
अकोल्यातील एका फिर्यादीने ३० डिसेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन सायबर येथे तक्रार नोंदविली.यामध्ये त्यांची जहीद गणी मिर्चा या नावाच्या व्यक्तीशी फोनव्दारे ओळख झाली. त्यांनी फिर्यादीला त्यांच्या अॅन्टीक मेटल सेल बिझनेस बद्दल सांगितले.व तुम्ही त्या बिझनेस मध्ये गुंतवणूक केली की, एक कोटी रूपये नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले, त्यानंतर फिर्यादी यांनी जहीद गणी मिर्चा या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याचे सांगण्याप्रमाणे एकूण ९०,२४,८७० रूपये त्यांना पाठविले. त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत जहीद गणी मिर्चा या व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले यावरून त्यांनी पोलीस स्टेशन सायबर येथे तक्रार नोंदविली.यावरून माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे अकोला सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई अर्चित चांडक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेश कानपुरे आर्थिक गुन्हे शाखा व पोलीस हवालदार प्रशांत केदारे, पोलीस हवालदार शेख हसन व तेजस देशमुख पोस्टे सायबर यांनी कार्यवाही केली.
डिजिटल खुणा व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध
डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा येथून सह पोलीस निरीक्षक जितेश कानपुरे, पोलीस हवालदार शेख हसन, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवालदार प्रशांत केदारे व पोअम. तेजस देशमुख पोस्टे सायबर हे आरोपी अटक करणेकामी दिल्ली येथे रवाना झाले. स्थानिक पोलीसाच्या मदतीने दिल्ली येथुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले .