'त्या' चित्राला दिले 'अश्लील लुक' video व्हायरल

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
मध्य प्रदेश
Gwalior wall painting दशकभराहून अधिक काळापासून मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये रस्त्यांच्या भित्तींवर सामाजिक संदेश देणारी आणि दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष वेधणारी भित्तीचित्रे रेखाटली जात आहेत. स्थानिक प्रशासन आणि कलाकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही कला नागरिकांपर्यंत पोहोचू शकली. मात्र, आता या कलाकृतींवरही काही विकृतांची नजर पडल्याचे पाहायला मिळत आहे. ग्वाल्हेरमध्ये अत्यंत विभत्स पद्धतीने अश्लील खुणा रेखाटून भित्तीचित्र उध्वस्त करण्याची घटना घडली असून, यामुळे समाजात चिंता निर्माण झाली आहे.
 


Gwalior wall painting  
ग्वाल्हेर शहरातील या भित्तीचित्रांमध्ये योगसाधना करणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या सावल्यांची आकृती रेखाटण्यात आली होती. मात्र, काही लोकांनी या सावल्यांवर अश्लील खुणा काढल्या. या घटनेमुळे फक्त कलाकृतीच नाही तर सामाजिक मानसिकतेचा खालावलेला स्तरही स्पष्टपणे दिसून आला. अनेक नागरिक या घटनेमुळे हादरले आणि नाराजी व्यक्त केली.
 
 
 
 
या घटनाविरोधात आवाज उठवायला पुढाकार घेतला 11 वीच्या विद्यार्थिनीने. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या विकृतीविरोधात आपला निषेध व्यक्त केला. विद्यार्थिनीने म्हटले की, “महिलांच्या सावल्याही सुरक्षित नाहीत, तर समाजातील महिला सुरक्षेबाबत काय अपेक्षा ठेवावी?” या वक्तव्याने नागरिकांच्या मनात विचार निर्माण केला आणि सामाजिक चर्चेला गती दिली.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्वाल्हेर नगरपालिकेने तातडीने कारवाई करत भित्तीवरील सर्व अश्लील चिन्हे पांढऱ्या रंगाने मिटवली. तरीही, या घटनेतून समाजातील विकृतीची मानसिकता कशी बदलावी, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. फक्त शहरांचे भौतिक स्वरूप सुधारण्यापुरते प्रयत्न करून ‘स्मार्ट सिटी’ बनवणे शक्य नाही; नागरिकांच्या मानसिकतेत आणि सामाजिक संवेदनशीलतेत बदल आवश्यक आहे, अन्यथा विकासाच्या मार्गावर शहराची वाट अधोगतीकडे वळेल.ग्वाल्हेरमधील ही घटना केवळ स्थानिक कलाकृतींचा अपमान नाही, तर समाजातील विकृत वृत्ती आणि असंवेदनशील मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. या घटनेतून एकच संदेश स्पष्ट होतो की, शहरांना खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवायचे असेल, तर भौतिक सुधारणा आणि प्रशासकीय उपाययोजना इतक्यापुरत्या मर्यादित राहू नयेत; नागरिकांच्या नैतिक आणि सामाजिक जागरुकतेत बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे.