तांदळात भारताची जागतिक भरारी

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
 
 
वेध
rice production भारत हा सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून समोर आला आहे. तांदूळ उत्पादनात क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकत भारताने कृषी क्षेत्रात अव्वल स्थान पटकावत हा झेंडा रोवला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे भारताने दुष्काळाशी सामना केला. अन्न टंचाईमुळे होणारे मृत्यू हे वेदनादायी होते. त्यावेळी भारताने जगातील मित्रराष्ट्राकडे गहू, तांदूळ या प्रमुख खाद्यान्नाची मागणी केली. पण तेव्हाच्या मोठ्या राष्ट्रांनी या मागणीकडे दुर्लक्षच केले. एवढेच नव्हे तर काहींनी आमच्या येथे होणाऱ्या भूकबळींचा उपहास करीत या निमित्ताने लोकसंख्या कमी होत असल्याचे म्हटले. त्या परिस्थितीतवरही भारताने मात केली आणि आता तर ऐतिहासिक कामगिरी करीत भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश म्हणून स्थान मिळवले.
 
 

तांदूळ उत्पादन  
 
 
विशेष म्हणजे ही माहिती अमेरिकेच्या यूएसडीए अर्थात युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरच्या डिसेंबर 2025 च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. जगभरात उत्पादित होणाऱ्या तांदळाच्या उत्पादनापैकी 28 टक्के तांदूळ भारतात होतो. चीनमध्ये 146 दशलक्ष मेट्रिक टन, तर भारतात 152 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन झाल्याची नोंद या अहवालात आहे. म्हणूनच भारत अव्वल ठरल्याचे अहवालात नमूद आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची कृषी निर्यात 4,50,840 कोटींवर पोहोचली. ज्यात तांदळाचा वाटा 24 टक्के होता. बासमती तांदळासह विविध जातींच्या तांदूळ निर्यातीतून सुमारे 1,05,720 कोटींचे परकीय चलन मिळाले. यावरून तांदूळ उत्पादन वाढ आणि निर्यात अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे हे अधोरेखित होते.
सर्वाधिक तांदूळ उत्पादनाचे हे यश जगाचा पोशिंदा म्हणविल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या श्रमातून मिळालेे यात दुमत असूच शकत नाही. पण या यशात संशोधकांचे भक्कम पाठबळ आणि सरकारची कृषी क्षेत्राबाबत असलेली सकारात्मक दृष्टी याचेही योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर शेती उत्पादन नेहमीच निसर्गाच्या लहरीवर अवलंबून होते. सिंचनाची सोय, शेती उत्पादनाची साठवणूक, उत्पन्नाला मिळणारा बाजारभाव याची देखील चिंता शेतकऱ्याला सतत छळत असे. तत्कालीन शासनाने याबाबत उपाययोजना केल्या नाहीत असे म्हणणे योग्य नसले तरी त्या-त्या वेळच्या सरकारची भूमिका केवळ तात्पुरती मलमपट्टी करणे अशीच राहिली. दरम्यान, विकसित भारत हे ध्येय घेऊन काम करणारे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय दूरदृष्टी ठेवून घेण्यात आले.
शेतीतील उत्पादन केवळ अन्नाची गरज पूर्ण करणारेच नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे ठरू शकते. ही भूमिका स्वीकारून त्याप्रमाणे सरकारने धोरणे निश्चित केले. नवनवीन वाणांचे संशोधन, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे बीज यासह शेतकऱ्यांच्या लहान-लहान प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी प्रयोगशाळेतील संशोधन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यात आले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेत पारदर्शकता, सरकारी खरेदी यंत्रणांचे सक्षमीकरण झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला. या सर्व धोरणांचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांना मिळायला लागला. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा झाला आणि तांदूळ उत्पादनात सातत्याने वाढ झाली.rice production म्हणूनच तांदूळ उत्पन्नाची चीनची मक्तेदारी आपल्या देशाने मोडीत काढली. वास्तविक विशाल सिंचन व्यवस्था, यांत्रिकीकरण आणि केंद्रीकृत नियोजन असलेल्या चीनपेक्षा अधिक उत्पादन घेणे हे सोपे नाहीच. पण भारताने हवामानातील वैविध्यता, लहान शेतजमिनी आणि लाखो शेतकऱ्यांच्या सहभागातूनच हे यश मिळवले. हीच भारतीय शेतीची ताकद आहे. उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येणे म्हणजे व्यवस्थापनाची परिपक्वता आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताने देशांतर्गत गरजा पूर्ण करून तांदूळ निर्यातीत स्थान मिळविले. अनेक देश अन्नासाठी तांदळाच्या आयातीवर अवलंबून असताना भारत विश्वसनीय पुरवठादार म्हणून समोर येणे ही बाब परराष्ट्र धोरणाला बळकटी देणारी आहे.
 
नीलेश जोशी
9422862484