नवी दिल्ली,
Naval base at Haldia चीन आणि बांगलादेशसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सागरी सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बंगालच्या उपसागरात भारताची सामरिक पकड अधिक मजबूत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदलाचा नवा तळ उभारला जात आहे. या निर्णयामुळे पूर्व किनारपट्टीवरील भारताची सागरी देखरेख, जलद प्रतिसाद क्षमता आणि संरक्षण सज्जता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. गेल्या काही वर्षांत भारताचे शेजारी देशांशी असलेले संबंध तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानसोबतचा संघर्ष जुना असला तरी चीनसोबत सीमावाद आणि बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत कोणत्याही संभाव्य धोक्याला त्वरित प्रत्युत्तर देता यावे, यासाठी भारतीय नौदलाने हल्दिया येथे नवा तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचा वापर नौदल तळ म्हणून केला जाणार आहे. येथे अतिवेगवान इंटरसेप्टर क्राफ्ट तसेच ३०० टन क्षमतेच्या वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्टची तैनाती केली जाईल. ही अत्याधुनिक युद्धनौका ताशी ४० ते ४५ नॉट्स वेगाने हालचाल करू शकतात आणि समुद्रातील कोणत्याही संशयास्पद हालचालींवर झपाट्याने कारवाई करण्यास सक्षम आहेत. हा नौदल तळ आकाराने तुलनेने लहान असला, तरी तो तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आधुनिक असेल. सुमारे १०० अधिकारी आणि खलाशांची तैनाती येथे केली जाणार असून, अत्याधुनिक दळणवळण, निरीक्षण आणि लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध असतील. कोलकात्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेला हा तळ बंगालच्या उपसागरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे.
दरम्यान, भारताच्या पूर्व सीमेजवळ चीन आणि बांगलादेश यांच्यातील वाढती जवळीकही दिल्लीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चीनने बांगलादेश नौदलाला पाणबुड्या दिल्या असून, चितगावजवळ नौदल तळ उभारण्यातही मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर हल्दिया येथील भारतीय नौदल तळ भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या नव्या तळामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून, चीन आणि बांगलादेशकडून येणाऱ्या कोणत्याही संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या माध्यमातून दिला गेला आहे.