राष्ट्रवादी एकत्र! पुण्याचा विकासाची 'गॅरंटी' जाहीरनामा प्रसिद्ध

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
पुणे,
ajit pawar राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होत असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण चित्र समोर आले आहे. राज्य सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट)सोबत सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट येथे एकत्र आले आहेत.
 

Pimpri-Chinchwad elections 
 
 
पुण्यात नुकताच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे हे एकाच मंचावर उपस्थित होते. विशेष म्हणजे, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली.
 
 
जाहीरनाम्याचे सादरीकरण करताना अजित पवार यांनी पुणेकरांसाठी पाच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहराला नळाव्दारे नियमित पाणीपुरवठा, पाण्याच्या उंच टाक्यांची उभारणी, पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणे, नवीन शाळांना मान्यता देणे तसेच झोपडपट्टी पुनर्वसनावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणेकरांना अधिक चांगल्या मूलभूत सुविधा कशा देता येतील, यावर जाहीरनाम्यात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अजित पवार भाजपासोबत लढणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र अखेर ही निवडणूक भाजपासोबत न लढता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्य पातळीवर अजित पवार हे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट)सोबत सत्तेत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळे राजकीय गणित मांडण्यात आले आहे.या युतीबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार आणि माझ्यातील कौटुंबिक संबंध कायमच चांगले राहिले असून ते कधीही दुरावले नाहीत, असे त्यांनी सांगितले. मात्र राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक पक्ष अशाच प्रकारच्या युती करून निवडणुका लढत असल्याचे सांगत, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ही युती त्या पार्श्वभूमीवर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.या घडामोडींमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील राजकीय लढत Pimpri-Chinchwad elections अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.