रिसोड,
Nizampur renaming, तालुयातील रिसोड शहरालगत असलेल्या मौजे निजामपूर ग्रामपंचायतीच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय आता अंतिम टप्प्याकडे जात असल्याचे चित्र आहे. गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्याच्या प्रक्रियेला लोकनियुक्त सरपंच उषा किसन जाधव यांच्या ठाम नेतृत्वामुळे निर्णायक वेग मिळाला आहे.
मोगलाई निजामशाहीच्या काळातील ‘निजामपूर’ हे नाव बदलावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून प्रलंबित होती. मात्र, सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उषा किसन जाधव यांनी या संवेदनशील विषयाला प्राधान्य देत ग्रामस्थांच्या भावना शासन दरबारी प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला असून, नामांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन गावाला नवी, सन्मानाची ओळख मिळावी, हा सरपंचांचा स्पष्ट हेतू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. सरपंच उषा किसन जाधव यांच्या या निर्णयात्मक भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, निजामपूरचे नाव ‘श्रीरामपूर’ होण्याची अपेक्षा आता अधिक बळावली आहे. निजामशाहीच्या काळातील ‘निजामपूर’ हे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करणे ही केवळ नामांतराची प्रक्रिया नसून, ग्रामस्थांच्या भावना आणि आपल्या लोकशाही मूल्यांचा सन्मान आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही याबाबत ठराव मंजूर केला असून, शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच हे नामांतर प्रत्यक्षात येईल, असा विश्वास आहे.