मलेशिया,
PV Sindhu out of Malaysia Open मलेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूची आगेकूच उपांत्य फेरीतच थांबली. दीर्घ दुखापतीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त होत कोर्टवर पुनरागमन केलेल्या सिंधूने या स्पर्धेत दमदार खेळ दाखवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र १० जानेवारी रोजी झालेल्या उपांत्य सामन्यात चीनची जागतिक क्रमांक दोन खेळाडू वांग शीयी हिने तिला सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली.

या सामन्यात सुरुवातीपासूनच वांग शीयीचा दबदबा दिसून आला. पहिल्या सेटमध्ये सिंधूला अपेक्षित लय सापडली नाही आणि तिने हा सेट १६–२१ अशा फरकाने गमावला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने आक्रमक खेळ करत चांगली सुरुवात केली आणि ११–६ अशी आघाडी घेतली. तिच्या या खेळामुळे सामना तिसऱ्या सेटपर्यंत जाण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र यानंतर वांग शीयीने खेळाची सूत्रे पुन्हा आपल्या हातात घेतली. तिने सलग गुण मिळवत दबाव वाढवला, सामन्यात बरोबरी साधली आणि नंतर निर्णायक टप्प्यावर वर्चस्व राखत दुसरा सेट २१–१५ असा जिंकला. या विजयासह वांग शीयीने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले, तर सिंधूची मलेशिया ओपनमधील वाटचाल इथेच थांबली. पराभव असूनही पीव्ही सिंधूचे हे पुनरागमन आशादायक मानले जात आहे. तब्बल तीन वर्षांनंतर तिने सुपर १००० दर्जाच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली असून, तिच्या खेळात आत्मविश्वास आणि लय हळूहळू परत येत असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, मलेशिया ओपनमधील भारताची आघाडीची पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचीही मोहीम क्वार्टरफायनलमध्येच संपुष्टात आली. या लढतीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या फजर अल्फेन आणि मुहम्मद फिक्री या जोडीशी झाला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये इंडोनेशियन जोडीने आक्रमक खेळ करत सात्विक-चिराग यांना २१–१० अशा मोठ्या फरकाने मागे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने जोरदार प्रतिकार करत सामना रंगतदार केला, मात्र शेवटच्या क्षणी संधी निसटली आणि त्यांना २३–२१ अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताची पुरुष दुहेरीतील आव्हानही मलेशिया ओपनमध्ये संपुष्टात आले.