समुद्रपूर,
samudrapur-wardha-tiger तालुक्यातील चिखली-उमरी परिसरातील सचिन पोफळे यांच्या शेतात वाघ दिसल्याने शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून करूळ, पवनगाव, गांगापूर, चिखली, उमरी येथील शेतकर्यांना शेतात काम करताना वाघाचे पगमार्क तसेच प्रत्यक्ष दर्शन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा शेतात जाणे नागरिकांनी टाळले आहे.
(फोटो : पगमार्क आणि ओझरता दिसलेला वाघ)
samudrapur-wardha-tiger उमरी येथील शेतकरी सचिन पोफळे यांचे शेत चिखली मार्गावर उमरी शिवारात आहे. सायंकाळी ते शेतातील गोठ्याजवळ गेले असता त्यांना अचानक समोरून पट्टेदार वाघ येताना दिसला. वेळीच ते गोठ्यात शिरून दार बंद करून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून गावातील शेतकर्यांना फोन द्वारा वाघाची माहिती दिली. आदल्या दिवशी रात्री चिखलीजवळ वाघ आढळून आला होता. त्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाघाच्या भितीमुळे शेतीची कामे खोळंबली आहे.
samudrapur-wardha-tiger सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून पथकाकडून परिसरात पाहणी सुरू केली आहे. ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, एकट्याने शेतात न जाणे, रात्रीच्या वेळी बाहेर न पडणे आणि वाघ दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळकरी मुले, महिला व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरे लावून गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.