डेअरी युनियनची अधिकृत स्थापना

दुध दरवाढीची घोषणा

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
वाशीम,
Washim Dairy Union जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक हित जपण्यासाठी आणि दुग्धव्यवसायाला संघटित स्वरूप देण्यासाठी वाशीम डेअरी युनियनची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असून, दुग्धव्यवसायाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.
 

Washim Dairy Union 
युनियनच्या स्थापने निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत युनियनच्या पदाधिकार्‍यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी गजानन वानखेडे, उपाध्यक्षपदी मो. असलम, सचिवपदी सीताराम कुटे तर कोषाध्यक्षपदी ऋषिकेश देशमुख यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करत युनियनच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पहिल्याच बैठकीत दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन महत्त्वाचे व शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दूध विक्री दरात प्रति लिटर १० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याचबरोबर दूध खरेदी दरातही वाढ करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकर्‍यांना वेळेवर आर्थिक व्यवहार होण्यासाठी दूध बिल वेळेवर अदा करण्याची हमी देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पदाधिकार्‍यांनी सांगितले की, दूध उत्पादक शेतकरी हा दुग्धव्यवसायाचा कणा असून, त्यांना योग्य दर, पारदर्शक व्यवहार आणि वेळेवर पैसे मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच वाशीम डेअरी युनियनची स्थापन करण्यात आली. भविष्यात दूध संकलन केंद्रे वाढवणे, दर्जेदार पशुखाद्य उपलब्ध करून देणे, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण शिबिरे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धव्यवसाय अधिक सक्षम करण्याचा मानस आहे.
वाशीम डेअरी युनियनच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाला चालना मिळणार असून, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या संघटीत शक्तीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे शोषण थांबेल आणि सहकाराच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल होईल, असा विश्वास दूध उत्पादक शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.