हिंगणघाट,
Maroti Ward येथील मारोती वार्ड परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दंततज्ज्ञ डॉ. संदीप मुडे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी थेट बेडरूममधील कपाट फोडून मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, याच परिसरातील आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती असून या घटनेबाबत अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार ९ रोजी डॉ. संदीप मुडे व त्यांची पत्नी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कामानिमित्त नागपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुमारे ८ वाजता कामासाठी येणारी महिला घरात पोहोचली असता मुख्य दरवाजालगत असलेले लोखंडी गेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत तिला दिसले. त्यामुळे तिने तत्काळ शेजार्यांना माहिती दिली तसेच डॉ. मुडे यांच्याशी संपर्क साधून घरफोडीची माहिती दिली.
माहिती मिळताच डॉ. मुडे दाम्पत्य तातडीने हिंगणघाटला परत आले. घराची पाहणी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत वर्धा येथील ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरट्यांनी घरातील बेडरूममधील कपाट फोडून त्यामधील मौल्यवान दागिने व रोख रकम असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआरही चोरट्यांनी सोबत नेल्याने हे चोरटे सराईत गुन्हेगार असावेत, असा अंदाज पोलिसांकडून व्यत करण्यात येत आहे.
दरम्यान, परिसरातील जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही घरफोडी रविवारी मध्यरात्री ३ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.