डॉक्टर कॉलनीत धाडसी घरफोडी

-१७ लाखा ऐवज लंपास -कुटुंब गेले होते अमेरीकेला

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
burglary-case : शहरातील कठोरा नाका भागातील डॉक्टर कॉलनीमध्ये राहणार्‍या एका विभागीय लेखा अधिकार्‍यांचे बंद घर चोरट्यांनी लक्ष्य केले. लेखा अधिकारी पत्नीसह अमेरीकेला त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. २३ डिसेंबर ते ११ जानेवारीदरम्यान त्यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे २३० ग्रॅम सोन्याचे, ६६३ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच दिड लाख रुपये रोख असा सुमारे १७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही चोरी झाल्याचे रविवारी सकाळी उघझ झाले.
 
 
amt
 
सतीश रामचंद्र बोर्डे (५९, रा. डॉक्टर कॉलनी, कठोरा नाका परिसर) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. सतीष बोर्डे हे वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी असून ते सद्या शेगाव येथे कार्यरत आहेत. दरम्यान त्यांची मुलगी अमेरीकेतील सेंट फान्सिस्को या शहरात खासगी कंपनीत कार्यरत आहे. त्यामुळे ती अमेरीकेतच रहायला आहे. दरम्यान मुलीला भेटण्यासाठी बोर्डे दाम्पत्य २३ डिसेंबरला भारतातून सेंट फ्रान्सिस्कोला गेले होते. दरम्यान प्रवासात सोने, चांदीचे दागिने घेऊन जाण्यात अडचणी येतील म्हणून त्यांनी घरातच सर्व दागिने व रक्कम ठेवली होती. तसेच या काळात घरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीला सुध्दा सांगितले होते. मात्र चोरट्यांनी या काळात संधी साधून बोर्डे यांचे घर लक्ष्य केले. चोरट्यांनी बोर्डे यांच्या घरात प्रवेश करुन मागील बाजूने असलेली लाकडी खिडकी व लोखंडी ग्रील कापली आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरमध्ये असलेले सुमारे २३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ६६३ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विवीध वस्तू लंपास केल्यात. याचवेळी दिड लाख रुपयांची रोखसुध्दा चोरट्यांनी लंपास केली. पोलिसांनी या प्रकरणात १६ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद केली आहे.
 
 
रविवारी सकाळी बोर्डे दाम्पत्य अमेरीकेतून घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहीती दिली. माहीती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर, पीएसआय गवई तसेच गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय संदीप चव्हाण व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीसुध्दा घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.